रत्नागिरी : हापूस आंबा कोकणची मुख्य अर्थव्यवस्था असून, हा हंगाम दोन महिनेच चालतो. त्यावर वर्षभराचा खर्च चालतो. आंबा बागायतदारांची पुढची तरुण पिढी दलालाना आंबे न देता स्वतः आंब्याचे मार्केटिंग करत आहे. अनेक शेतकरी थेट मुंबई, पुणे, ठाणे येथे घरपोहोच पेट्या करीत आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने आंबा बागायतदारांना भविष्यात चांगले दिवस येत आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आंबा वाहतूक करणाऱ्यांना महामार्गावरील आणि त्या त्या मेट्रोसीटीतील पोलिसांचे सहकार्य मिळावे, अशी मागणी शिवस्वराज्य आंबा बागायतदार संघटनेतर्फे संजय यादवराव यांनी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आंबा वाहतूक करणाऱ्या एमएच ०७ आणि एमएच ०८ क्रमांकाच्या गाड्या पाहिल्यानंतर मुंबई, पुण्यासह नव्या मुंबईतील वाशीबाजार परिवर आणि मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पोलिस यांच्याकडून वा वाहतूकदारांना आणि शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना वारंवार थांबविण्यात येते. याचा त्रास शेतकऱ्यांना होत आहे. हापूस आंबा कहणजे श्रीमंत उत्पादन असा विचार केला जात असल्याने वाहतुकदारांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. ज्या पद्धतीने भाजीपाला शेतकऱ्यांना मदतीचे धोरण सरकारकडून घेतले जाते, त्या स्वरूपाचे धोरण आंबा बागायतदारांसाठीही पोलिसांनी घेतले पाहिजे.
शेतकरी या नात्याने पोलिसांकडून आणि प्रशासनाकडून जास्तीत जास्त सहकार्य मिळायला पाहिजे. काही चुका झाल्या तर दंड करून; अन्यथा ताकीद देऊन सोडले पाहिजे. शहरांमधील वाहतुकीचे सगळेच नियम ग्रामीण भागातील चालकांना किंवा शेतकऱ्यांना माहीत नसतात. आंबा वाहतुकीसाठी वाहतूक पोलिसांकडून विशेष सहकार्य मिळणे आवश्यक आहे. याबाबत गृह राज्यमंत्री योगेश कदम निश्चितच तोडगा काढतील, अशी अपेक्षा यादवराव यांनी व्यक्त केली आहे.
बागायतदारांची लवकरच बैठक
निवदेन दिल्यानंतर मंत्री श्री. कदम यांनी कोकणातील बागायतदारांची ही समस्या समजून घेतली आणि त्यावर त्वरित उपाययोजना करण्याचे मान्य केले आहे. कोकणातील शेतकरी आणि आंबा बागायतदार यांची विशेष बैठक लवकरच आयोजित करणार असल्याचेही मंत्री कदम यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 AM 04/Apr/2025
