चिपळूण : शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय खरवते दहिवली (ता. चिपळूण) येथील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांकडून व्यावसायिक दृष्टिकोनातून आळंबी उत्पादन घेण्यात आले. अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रमाअंतर्गत हा प्रकल्प या विद्यार्थ्यांकडून राबवण्यात आला. आळंबी कोकणसाठी उत्तम रोजगाराचे साधन ठरू शकते, असे विद्यार्थ्यांना वाटत आहे.
कोकणामध्ये कृषी पूरक व्यवसायांची व्याप्ती वाढली पाहिजे, उद्योगशील तरुण वर्ग, महिला स्वयंसहाय्यता गट, बचत गट यांनी पुढाकार घेऊन कमी श्रम व खर्चामध्ये उपलब्ध संसाधनांचा पुरेपूर वापर करुन हा व्यवसाय करत भरघोस उत्पादन घ्यावे, हा उद्देश उराशी बाळगून या विद्यार्थ्यांकडून आळंबीच्या विविध जातींचे महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावरील प्रयोग शाळेतून उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. २५ बाय १५ आकाराच्या दोन बंदिस्त खोल्यांमधून हा प्रकल्प साकारण्यात आला आहे.
यामध्ये सेंद्रिय व रासायनिक अश्या दोन्हीं पद्धती वापरुन ४ पद्धतीच्या अळंबीचे उत्पादन करत योग्य नियोजन व व्यवस्थापन केल्यास कमीत कमी संसाधनांत हा प्रकल्प उत्तम रोजगाराचे साधन ठरेल हे सिद्ध केले आहे. या विद्यार्थ्यांकडून आळंबीच्या प्युरटेस फ्लोरिडा, ब्लु ऑईस्टर, प्युरटेस साजर कॅजु व पिंक मशरूम्स इ. जातीचे सुमारे ६० किलो उत्पादन घेण्यात आले.
सद्यस्थितीत आळंबीचा बाजारभाव हा प्रति किलो ५०० रूपये आहे. परिसरातील हॉटेलमध्ये या विद्यार्थ्यांकडून उत्पादीत केलेल्या अळंबीला मोठी मागणी आहे. या उत्पादनासाठी लागणारा प्रमुख घटक म्हणजे स्पॉन आहे. हा घटक विद्यार्थ्यांनी पुणे येथील कृषी महाविद्यालयामधून मागवले असून भविष्यात शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेतूनच हे स्पॉन कसे तयार होतील यासाठी प्रयत्नशील आहेत.
विद्यार्थ्यांकडून उत्पादित आळंबीवर प्रक्रिया करत त्या पासून बिस्किट, लोणचे, पावडर बनवण्यात आले असून याची यशस्वी विक्री आली आहे. सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखर निकम व प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील यांनी या प्रकल्पास भेट देऊन मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेल्या कामाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना प्रकल्प अधिकारी प्रा. संग्राम ढेरे यांचे मार्गदर्शन लाभले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:45 PM 04/Apr/2025
