रत्नागिरी : जिल्ह्यात वर्षभरात लैंगिक अत्याचाराचे ८० गुन्हे

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली असून, गेल्या वर्षभरात तब्बल ८० गुन्हे पोलीस दप्तरी नोंदवण्यात आले आहेत. या वाढत्या घटनांमुळे जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, नागरिकांमध्ये चिंतेचे आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.

वर्षभरात घडलेल्या गुन्ह्यांमध्ये रत्नागिरी तालुका (२२), दापोली (२२), आणि खेड (१७) येथे सर्वाधिक घटनांची नोंद झाली आहे. याखालोखाल राजापूर (६), संगमेश्वर (६), लांजा (४), आणि मंडणगड (३) तालुक्यांमध्येही अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. ही आकडेवारी जिल्ह्यातील महिला सुरक्षेची गंभीर स्थिती दर्शवत असून, या वाढत्या गुन्हेगारीला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

या गंभीर परिस्थितीला जिल्ह्यातील नोंदणी क्रमांक नसलेल्या (विनानंबर प्लेट) वाहनांचा वाढता वावर आणि त्याकडे होणारे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष हातभार लावत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. रत्नागिरी शहरासह जिल्ह्यात अनेक वाहने विनानंबर प्लेट फिरत असतानाही त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याचे चित्र आहे. अशा वाहनांचा वापर गुन्हेगारी कृत्यांसाठी, विशेषतः महिलांवरील अत्याचारांसाठी केला जात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना आणि नोंदणी नसलेल्या वाहनांची समस्या यामुळे पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या घटना रोखण्यासाठी आणि महिलांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:26 PM 04/Apr/2025