Weather Update : हवामान खात्याने महाराष्ट्र, बिहार आणि छत्तीसगडसह 17 राज्यांमध्ये वादळ आणि जोरदार वाऱ्याचा इशारा जारी केला आहे. झारखंडमध्ये गारांसह पाऊस पडू शकतो. याशिवाय देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
गुजरातमध्ये उष्णतेची लाट आणि आर्द्रता कायम राहू शकते. दुसरीकडे, काल कर्नाटक, महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या विविध भागात पाऊस झाला. पावसानंतर कर्नाटकच्या कमाल तापमानात 7.5 अंशांपर्यंत घसरण झाली. इकडे राजस्थानमध्ये वादळ आणि पाऊस पाहायला मिळाला. मात्र, बाडमेर आणि जैसलमेर भागात उष्णता वाढू लागली आहे.
चारमिनारच्या प्लास्टरचा काही भाग कोसळून खाली पडला
तेलंगणातील यदाद्री-भुवनगिरी जिल्ह्यात 97.8 मिमी पाऊस झाला. तर हैदराबादमध्ये 91 मि.मी, पाऊस झाला. त्यामुळे चारमिनारच्या प्लास्टरचा काही भाग कोसळून खाली पडला. एएसआयने सांगितले की, टॉवरच्या दुसऱ्या मजल्याचा एक तुकडा पडला होता. पडलेला भाग हा दगडी बांधकामाच्या वरचा एक सजावटीचा भाग होता. गुरुवारी राजधानी दिल्लीत कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. मोसमातील हा उच्चांक होता. त्याच वेळी, किमान तापमान 15.6 अंश सेल्सिअस होते, जे सामान्यपेक्षा तीन अंशांनी कमी होते. यापूर्वी 26 मार्च रोजी सर्वाधिक तापमान 38.9 अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते.
दुसरीकडे, महाराष्ट्रात कडक उष्मा (Maharashtra Weather Alert) आहे, तर दुसरीकडे हवामान खात्याने (IMD) हवामानात अचानक बदल होण्याचा इशारा दिला आहे. मराठवाडा आणि विदर्भात तापमानाने 40 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान, राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस, मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. बुधवारी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता असून गारपीट होण्याचीही शक्यता आहे.
महाराष्ट्रावर उष्मा, पाऊस, धुके आणि गारपिटीचा तिहेरी हल्ला
उष्मा, पाऊस, धुके आणि गारपिटीचा तिहेरी हल्ला महाराष्ट्रावर होत आहे. वाढत्या तापमानामुळे विदर्भ-मराठवाड्यातील अनेक भागात उष्णतेसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी रब्बी हंगामातील पिके काढणीसाठी तयार आहेत, मात्र अचानक वादळ, पाऊस आणि गारपिटीमुळे मोठे नुकसान होत आहे. मध्य महाराष्ट्रात चक्री वारे तयार झाले असून त्यामुळे येत्या 24 तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारे आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, सातारा, अमरावती, चंद्रपूर जिल्ह्यांत मेघगर्जनेसह वादळी वारे व गारपीट होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन हवामान खात्याने 15 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट (सावधान रहा) जारी केला आहे, तर राज्याच्या इतर भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:44 04-04-2025
