मराठी भाषेच्या संवर्धनासाठी उदय सामंत यांची राज ठाकरे यांच्याशी चर्चा; लवकरच ठोस उपाययोजनांचा निर्णय

मुंबई : मराठी भाषा आणि उद्योग विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. सध्या राज्यात मनसेतर्फे मराठी भाषेच्या वापरासंदर्भात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही भेट विशेष महत्त्वाची ठरली आहे. या भेटीत मराठी भाषेच्या संवर्धनासंदर्भात सविस्तर चर्चा झाली असून, याबाबत ठोस उपाययोजना करण्याचे संकेत मिळाले आहेत.

मराठी भाषेच्या वापरावर सविस्तर चर्चा
भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उदय सामंत म्हणाले, “मराठी भाषा विभागाचा मंत्री म्हणून मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परवानगीने राज ठाकरे यांची भेट घेतली. बँका आणि इतर संस्थांमध्ये मराठी भाषेचा वापर व्हावा, यासंदर्भात राजसाहेबांनी काही महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या आहेत. या सूचना मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे. यावर लवकरच चर्चा करून पुढील कार्यवाही ठरवली जाईल.”

मराठीचा सन्मान राखण्यावर शासनाचा भर
महाराष्ट्रात अनेक भाषा बोलल्या जात असल्या तरी मराठी भाषिकांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, “मराठीचा सन्मान राखणे हे राज ठाकरे यांचे मत आहे आणि तीच आमचीही भूमिका आहे. मराठी भाषेची प्रतिष्ठा जपण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल.”

औद्योगिक क्षेत्रात सक्ती नाही, पण प्रेरणा
औद्योगिक क्षेत्रात मराठी भाषा सक्तीने लादण्याचा कोणताही विचार नसल्याचे सामंत यांनी नमूद केले. ते म्हणाले, “जगभरातून गुंतवणूकदार महाराष्ट्रात येत आहेत. त्यांना मराठी शिकण्यासाठी प्रेरणा दिली जाईल, परंतु सक्ती केली जाणार नाही. मात्र, ज्या संस्था आणि बँकांचा थेट संबंध जनतेशी येतो, तिथे मराठीत व्यवहार होणे गरजेचे आहे.” यासंदर्भात राज्यभरातील जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुढील कार्यवाही ठरवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मराठी भाषा संवर्धन समितीची बैठक लवकरच
राज्यात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी स्थापन करण्यात आलेल्या समित्यांची बैठक पुढील आठवड्यात होणार आहे. या बैठकीत मराठीचा वापर टाळणाऱ्या संस्थांवर योग्य ती कारवाई करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सामंत यांनी स्पष्ट केले. “मराठी भाषेचा वापर न करणाऱ्या संस्थांना सूचना देऊन त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई केली जाईल,” असे त्यांनी नमूद केले.

संस्थांना आश्वासन, कायदा हातात घेऊ नये
शेवटी, उदय सामंत यांनी सर्व संस्थांना आणि बँकांना आश्वस्त करताना सांगितले, “भयमुक्त वातावरणात चर्चा करून मराठी भाषेचा सन्मान राखण्यासाठी शासन सजग आहे. कोणत्याही संस्थेने घाबरण्याचे कारण नाही. मराठीचा सन्मान राखला गेला पाहिजे, यासाठी शासन आग्रही आहे. मात्र, याबाबत कोणीही कायदा हातात घेऊ नये, ही शासनाची स्पष्ट भूमिका आहे.”

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:52 05-04-2025