मंदिरातून घरी येताना बसमध्ये पोटच्या लेकरांदेखत आईवर सामूहिक अत्याचार

कर्नाटकातील दावणगेरे जिल्ह्यात एका खासगी बसमध्ये महिलेवर तिच्या मुलांसमोर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. स्थानिक पोलिसांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे.

त्यानंतर विजयनगर जिल्ह्याच्या एसपींच्या मध्यस्थीनंतर कारवाई करण्यात आली. ही महिला विजयनगर येथील रहिवासी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दावणगेरे येथील हरपनहल्ली येथील उच्छंगीदुर्गा मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ही महिला आपल्या मुलांसह बसने घरी परतत होती. यावेळी चन्नापुरा गावाजवळ बस चालक, कंडक्टर आणि हेल्परने तिच्यावर बलात्कार केला.

मुलांच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला

प्राथमिक माहितीनुसार, महिला 31 मार्च रोजी आपल्या दोन मुलांसह उच्छंगीदुर्गा मंदिरात गेली होती. संध्याकाळी मंदिरापासून दावणगेरेला जाणारी शेवटची बस पकडली. बसमध्ये सात-आठ प्रवासी होते. सर्व प्रवासी उतरल्यावर आरोपींनी महिलेवर बलात्कार केला. ड्रायव्हरने बस चन्नापुराजवळ एका निर्जन ठिकाणी नेली आणि पीडित महिलेच्या मुलांच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून हातपाय बांधले. मुलांचे हात बांधून त्यांच्या आईवर त्यांच्यासमोर सामूहिक बलात्कार केला. काही वेळाने शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी येऊन महिलेला वाचवले. त्यांनी चालक प्रकाश माडीवालारा, कंडक्टर सुरेश आणि हेल्पर राजशेखर यांना पकडून अरसिकरे पोलिसांच्या ताब्यात दिले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका आरोपीवर यापूर्वी सात गुन्हे दाखल आहेत.

पोलिस म्हणाले, गुन्हा दाखल करू नकोस, जगणं कठीण होईल

पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा नोंदवला नाही, असा आरोप आहे. त्याने एका कोऱ्या कागदावर पीडितेची स्वाक्षरी घेतली. पोलिसांनी दोन हजार रुपये दिले आणि नवीन कपडे घेण्यास सांगितले. महिलेचं जगणे कठीण होईल, असे सांगत पोलिसांनी महिलेला गुन्हा नोंदवू नका, असा सल्ला दिला. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा उच्छंगीदुर्गा मंदिरात सोडले. पोलिसांनी गरज पडेल तेव्हा फोन करून बोलवतो असे सांगत घरी जाण्यास सांगितले. पीडित महिलेने आपल्या मुलांसोबत मंदिरातच रात्र काढली. पोलिसांनी आरोपींना सोडून दिले. काही दिवसांनी एक महिला आपल्या दोन मुलांसह अनेक दिवस मंदिरात राहत असल्याचे स्थानिक नेत्यांना समजले तेव्हा त्यांनी तिच्याशी संपर्क साधला. यानंतर नेत्यांनी विजयनगरचे एसपी श्रीहरी बाबू यांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच एसपी अरासिकेरे पोलिस ठाण्यात पोहोचले आणि त्यांनी पीडितेचे जबाब नोंदवले. यानंतर आरोपींना अटक करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 05-04-2025