रत्नागिरी : डॉ. तोरल शिंदे, सुनीता गोगटे यांना स्वरूप योगिनी पुरस्कार प्रदान

रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ (पावस, रत्नागिरी) यांच्या वतीने दिला जाणारा स्वरूप योगिनी पुरस्कार प्रसिद्ध स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. तोरल शिंदे व मावळंगे येथील उद्योजिका सुनीता गोगटे यांना शीतल काळे आणि प्रतिभा प्रभुदेसाई यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

वरची आळी येथील अध्यात्म मंदिरात हा कार्यक्रम झाला. यावेळी व्यासपीठावर श्रीनिवास पेंडसे, स्वामी स्वरूपानंद मंडळाचे कार्यवाह हृषिकेश पटवर्धन, खजिनदार अमर देसाई, विवेक भावे आदी उपस्थित होते. प्रभुदेसाई यांनी डॉ. शिंदे व गोगटे यांचा परिचय करून दिला व मानपत्राचे वाचन केले.

सत्काराला उत्तर देताना डॉ. तोरल शिंदे म्हणाल्या की, रत्नागिरीत आतापर्यंत अनेक कुटुंबे जोडली गेली आहेत. वंध्यत्वावर काहीतरी करायचे ठरवले आणि पती डॉ. नीलेश शिंदे यांच्या प्रोत्साहन, पाठिंब्यामुळे कोकणातील पहिले रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सुरू करता आले. आजवरच्या या प्रवासात अनेकांनी बहुमोल मदत केली आहे. या पुरस्कारासाठी मी स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचे विशेष आभार मानते.

सुनीता गोगटे यांनी सांगितले, खेडेगावातील जगणे म्हणजे निसर्गाशी एकरुप होऊन जगणे आहे. आपण दुसरीकडे जाऊन नोकरी करण्यापेक्षा स्वतः उद्योगाकडे वळायचे ध्येय बाळगा. पुरस्काराबद्दल स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचे आभार मानले.

कार्यक्रमाची सुरुवात आसावरी परांजपे यांच्या देवीस्तुती गायनाने झाली. त्यांना तबलासाथ प्रसाद वैद्य, हार्मोनियमसाथ ओजस करकरे यांनी केली. आसावरी परांजपे यांचा सत्कार कार्यवाह हृषिकेश पटवर्धन यांनी केला. प्रवचनकार श्रीनिवास पेंडसे यांचा सत्कार अमर देसाई यांनी केला.

श्रीनिवास पेंडसे यांनी वीरांगना महाराणी दुर्गावती यांच्या ५०० व्या जन्मशताब्दी सांगता वर्षानिमित्त वीरांगना महाराणी दुर्गावती या विषयावर तृतीय पुष्प गुंफले.

पेंडसे म्हणाले की, ५ ऑक्टोबर १५२४ रोजी वीरांगना दुर्गावतीचा जन्म झाला. दुर्गाष्टमीचा जन्म म्हणून त्यांचे दुर्गावती असे नाव ठेवले. चंडेल वंशात रजपूत घराण्यात त्यांचा जन्म झाला. दुर्गावतींना शिकारीला जायचा शौक होता. दुर्गावती निष्णात रायफल चालवत. दुर्गावती कायमच वडिलांसोबत असायची. दुर्गावतीचा विवाह दलपत सिंह यांच्याशी झाला, ते गोंडवना भागातील होते. दुर्गावतीच्या मुलाचे नाव वीर नारायण होते. त्यांनी आपल्या १६ वर्षांच्या राज्यकारभारच्या काळात असंख्य तलाव, मंदिरे बांधली. सुखसोयी केल्या. प्रजेची न्यायव्यवस्था व शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 08-10-2024