रत्नागिरी, 06 एप्रिल 2025 : रत्नागिरी जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या विरोधात कठोर कारवाईचा भाग म्हणून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (स्थागुअशा) मोठी कामगिरी केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या सूचनांनुसार, रविवारी (06 एप्रिल 2025) रत्नागिरी शहर परिसरात रामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलिंग सुरू होते. याच दरम्यान, गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेऊन 77,500 रुपये किंमतीचा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला.
जयस्तंभ परिसरात मुसक्या आवळल्या
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक रत्नागिरी शहरात गस्त घालत असताना दुपारी 3:10 वाजता जयस्तंभ परिसरातील खाना खजाना हॉटेलजवळ संशयित अरमान आदिल अशरफ शेख हा दुचाकीवर बसलेला दिसला. त्याच्या हातात एक पिशवी होती आणि त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 15 ब्राऊन हेरॉईनच्या पुड्या आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. या मुद्देमालाची एकूण किंमत 77,500 रुपये आहे.
गुन्हा दाखल, तपास सुरू
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 1031/2025 अंतर्गत एन.डी.पी.एस. कायद्याच्या कलम 8(क) आणि 22(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित अरमान आदिल अशरफ शेख याला अटक करण्यात आली असून, पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस ठाणे करत आहे.
पोलिसांच्या या टीमने केली कारवाई
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोहेकॉं शांताराम झोरे, बाळू पालकर, दीपराज पाटील आणि गणेश सावंत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
अंमली पदार्थांविरोधात कठोर पावले
रत्नागिरी जिल्ह्यात अंमली पदार्थांचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी पोलीस प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील अंमली पदार्थविरोधी मोहिमेला आणखी बळ मिळाले आहे. नागरिकांनीही संशयास्पद हालचालींबाबत पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.














