गिरणी कामगारांचे आज निषेध आंदोलन

चिपळूण : गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नावर सरकारच्या खोट्या आश्वासनाविरुद्ध गिरणी कामगार रस्त्यावर उतरणार आहेत. दि. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा. गिरणी कामगार भारत माता सिनेमा (लालबाग-मुंबई) येथून कामगार मैदान येथे सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध करणार आहेत. या निषेध आंदोलनामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोकणातील गिरणी कामगारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

१५ मार्च २०२४ रोजी महाराष्ट्र शासनाने एक शासन निर्णय प्रसिद्ध केला. या निर्णयात ठाणे-कल्याण तालुक्यातील उत्तर शीव व हेदुटणे येथील ११.४६ हेक्टर जमीन गिरणी कामगारांच्या घरांसाठी उपलब्ध करून दिल्याचे जाहीर केले. ही जमीन आतापर्यंत म्हाडाकडे बांधकामासाठी हस्तांतरित झालेली नाही. तसेच पनवेलजवळ मॅरेथॉन व बालाजी या ठिकाणी १ हजार ३०० घरे तयार आहेत. पण त्यांचीही लॉटरी काढली जात नाही. तसेच टाटा हौसिंगची १ हजार २५० घरे कोरोना काळात रुग्णांना राहण्यास देण्यात आली. त्यांची मोठ्या प्रमाणात मोडतोड झाली. त्याची दुरुस्ती करण्याची मागणी आम्ही करीत आहोत. मात्र, गेली ४ वर्षे दुरुस्तीबाबतही काहीही झालेले नाही. त्यामुळे गिरणी कामगारांच्या घराबाबत सरकार उदासीन असल्याचा आरोप कृती समितीने केला आहे.

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पातील ५० ते ६० हजार घरांची पाहणी करण्यात आली होती. या संदर्भातील अटींमध्ये बदल करण्याचे ठरले होते. मात्र, पूर्वीचे सरकार बदलल्यानंतर विद्यमान सरकारने याबाबत काहीच निर्णय घेतलेला नाही. निषेध आंदोलनाचे नेतृत्व कृती समितीच्या समन्वयक जयश्री खांडीलकर-पांडे, जयप्रकाश भिलारे, गोविंदराव मोहिते, नंदू पारकर, निवृत्ती देसाई आदी कामगार नेते करणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 AM 08/Oct/2024