पालीच्या श्री लक्ष्मीपल्लीनाथच्या चैत्रोत्सवास उद्यापासून प्रारंभ; ६ दिवस धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

पाली : रत्नागिरी तालुक्यातील पाली-पाथरटचे ग्रामदैवत व कोकणातील प्रसिध्द पालीच्या श्री लक्ष्मीपल्लीनाथ देवस्थानचा वार्षिक चैत्रोत्सव सोहळा दि.८ ते १३ एप्रिलपर्यंत मुख्य मंदिरामध्ये पार पडणार आहे.

या सोहळ्यासाठी पालीतील मुख्य मंदिरात राज्यासह देशविदेशातील भाविक हजेरी लावून, श्रींची सेवा करीत असतात. उत्सव काळात दररोज धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. याची नियोजन सभा नुकतीच संपन्न झाली यावेळी देवस्थानचे मानकरी गुरुराज सावंत, अनंत पालकर, प्रदीप घडशी, बबन काजरेकर, सुभाष गराटे, चंद्रकांत गुडेकर, विष्णू माईण, रोहित पांचाळ,अनिल धाडवे,चंद्रकांत धाडवे व पाली-पाथरटमधील ग्रामस्थ उपस्थित होते.

यावर्षीचा वार्षिक चैत्रोत्सव सोहळा चैत्र शु.११ ते चैत्र कृष्ण १ शके १९४७ दि.८ ते १३ एप्रिलपर्यंत संपन्न होणार असून चैत्रोत्सवाची सेवा समस्त सुहास सरवटे व परिवार,पुणे हे करीत आहेत. उत्सव काळात दररोज सकाळी ७.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत वैयक्तिक पुजा, अभिषेक, एकादष्णी, लघुरूद्र, महारूद्र, यज्ञयागादी कर्मे आदि धार्मिक कार्यक्रम होतील. त्यानंतर दुपारी १२.३० ते १ वाजेपर्यंत नैवेद्य, आरती व मंत्रपुष्प, दुपारी १ ते २.३० वा.पर्यंत महाप्रसाद, सायंकाळी ६ ते ७.३० वा.पर्यंत रूपे लावणे व धुपारती व रात्री ८ ते ९ वा.पर्यंत आरती, मंत्रपुष्पांजली व नामजप असे नित्य कार्यक्रम होतील.

मंगळवार ८ एप्रिल रोजी रात्रौ ९.३० ते १०.३० वा.पर्यंत मंत्रजागर, १०.३० ते १२ वा.पर्यंत कीर्तन,१२ वा. पालखी प्रदक्षिणा व छबिना. बुधवार ९ एप्रिल रोजी रात्री ९.३० ते ११.३० वा. ह.भ.प. अभय dhangarekar यांचे कीर्तन, १२ वा. पालखी प्रदक्षिणा व छबिना. गुरुवार १०एप्रिल रोजी रात्री ९.३० ते १०.३० वा.पर्यंत भजन सादरकर्ते श्री. लक्ष्मीनारायण भजनमंडळ, हेदवी, गुहागर बुवा निखिल ओक व अभय ओक,रात्रौ १०.३० ते १२ वा पर्यंत

कीर्तन , रात्रौ १२ वा.पालखी प्रदक्षिणा व छबिना असे कार्यक्रम होणार आहेत.

शुक्रवार ११ एप्रिल रोजी रात्री ९.३० ते १०.३० वा. पर्यंत श्रुती व स्वरा कुलकर्णी यांचा कथ्थक नृत्य आविष्कार,१०.३० ते १२ वा. पर्यंत कीर्तन, १२ वा.पालखी प्रदक्षिणा व छबिना. शनिवार १२ एप्रिल रोजी रात्रौ ९.३० ते १०.३० वा.पर्यंत आरती, मंत्रपुष्पांजली व नामजप,रात्रौ १०.३० ते १ वा. पर्यंत गीतगायन सादरकर्ते अनमय बापट, मधुरा आठल्ये, स्वरा कुलकर्णी, आदिती हर्षे, रात्रौ १ ते पहाटे ३.३० वा.पर्यंत पालखी प्रदक्षिणा व छबिना,पहाटे ४ वा. कीर्तनकार ह.भ.प. विश्वनाथबुवा भाटे, उमरे रत्नागिरी, यांचे लळीताचे कीर्तन. रविवार १३ एप्रिल रोजी रात्रौ ९.०० वा. श्री लक्ष्मीपल्लीनाथ नाट्यमंडळ, पालीनिर्मित वसंत कानेटकर लिखीत २ अंकी प्रिय आईस या नाटकाचा प्रयोग होईल.

सर्व भक्तांनी चैत्रोत्सव पर्वात मंदिरामध्ये येऊन धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन देवस्थानचे मुख्य मानकरी व अध्यक्ष संतोष सावंतदेसाई यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 07-04-2025