मुंबई, दिनांक ७ एप्रिल २०२५ – जागतिक व्यापार तणाव आणि अमेरिकेतील मंदीच्या भीतीमुळे सोमवार, ७ एप्रिल हा भारतीय शेअर बाजारासाठी ‘ब्लॅक मंडे’ ठरला. बाजार उघडताच सेन्सेक्स ३,००० अंकांनी कोसळून ७२,३०० च्या खाली घसरला, तर निफ्टी ५० निर्देशांक १,१०० अंकांनी घसरून २१,७६० च्या पातळीवर आला. सेन्सेक्समध्ये ४ टक्के आणि निफ्टीमध्ये ५ टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवली गेली. या घसरणीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल १९ लाख कोटींनी कमी होऊन ३८३ लाख कोटींवर आले.
बाजारात विक्रीचा दबाव
सोमवारी सकाळी बाजार सुरू होताच गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड विक्रीचा दबाव दिसून आला. जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे भारतीय बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने ऐतिहासिक घसरण अनुभवली. या घसरणीने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
क्षेत्रीय निर्देशांकही लाल रंगात
प्रमुख क्षेत्रीय निर्देशांकांवरही या घसरणीचा मोठा परिणाम झाला. निफ्टी मेटल ८ टक्के आणि निफ्टी आयटी ७ टक्के घसरले. निफ्टी ऑटो आणि रियल्टी प्रत्येकी ५ टक्क्यांहून अधिक खाली आले. बीएसई मिडकॅप ४.६ टक्के तर स्मॉलकॅप ६ टक्के घसरून बंद झाले.
मोठ्या कंपन्यांचे शेअर्स धडाम
सेन्सेक्सवरील प्रमुख कंपन्यांमध्ये टाटा मोटर्सचा शेअर सर्वाधिक ९.८ टक्के घसरला. टाटा स्टील ९.६ टक्के, एचसीएल टेक ७ टक्के, एलटी ६.७ टक्के, तर टेक महिंद्रा, इन्फोसिस, रिलायन्स आणि अदानी पोर्ट्स प्रत्येकी ५ टक्क्यांनी खाली आले.
जागतिक बाजारात ब्लडबाथ
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन शुल्क लागू करण्याची घोषणा केल्यानंतर जागतिक व्यापार युद्धाची भीती वाढली आहे. गेल्या शुक्रवारी अमेरिकेतील एस अँड पी निर्देशांक ६ टक्के, डाऊ जोन्स ५.५ टक्के आणि नॅस्डॅक कंपोझिट ५.८ टक्के घसरले. या घसरणीचे पडसाद सोमवारी आशियाई बाजारांवरही उमटले. जपानचा निक्केई ८ टक्के, हाँगकाँगचा हँगसेंग ९.४ टक्के, शांघाय कंपोझिट ६.२ टक्के आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी ४ टक्के घसरला.
घसरणीचे कारण काय?
अमेरिकेतील मंदीची भीती आणि व्यापार तणावामुळे गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरली आहे. ट्रम्प यांच्या धोरणांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता असून, त्याचे थेट प्रतिबिंब शेअर बाजारावर दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते, ही घसरण अल्पकालीन असू शकते, परंतु पुढील काही दिवस बाजारातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे.
गुंतवणूकदारांना सावधानतेचा इशारा
अशा अस्थिर परिस्थितीत तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. बाजारातील घसरणीचा फायदा घेऊन दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी संधी शोधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 07-04-2025














