रत्नागिरी : स्वतःला विकसित करण्यासाठी झिजून गेलात तरी चालेल, पण बुद्धीने गंजून जाऊ नका. माणसांना संकट कधी मारत नाहीत तर भीती मारते. भीती घालवायची असेल तर अनुभव घ्या. सतत क्रियाशील राहून निराशेचे मळभ दूर करा. कसलीही अडचण येऊ द्या, पण काम करा आणि यश मिळवण्यासाठी मनाची तयारी ठेवा. जिजाऊ संस्था तुमच्या पाठीशी ठाम राहिल, असे व्याख्याते नितीन बानगुडेपाटील यांनी सांगितले.
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र यांच्या वतीने रत्नागिरी विभागात जिल्ह्यातील युवक आणि युवतींसाठी सरकारी नोकरीबाबत मार्गदर्शन महामेळावा रविवारी येथील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात झाला. या मार्गदर्शन कार्यक्रमासाठी जिजाऊ संस्थेचे संस्थापक नीलेश सांबरे, सुजित वाळके, कोलते, रोकडे, नंदकुमार मोहिते, मधुकर थुळ, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रथमेश गावणकर, साचिन चव्हाण, अॅड. महेंद्र मांडवकर, तालुकाध्यक्ष मंदार नैकर, युवाचे अक्षय बारगुडे आदी उपस्थित होते. नितीन बानगुडेपाटील यांनी सांगितले की, मोबाईल्सवर रिल्स बघायच्या नादात आपण एकाग्रता गमावून बसलो आहे. मोबाईलच्या वापरामुळे संवेदनशीलता हरवलीय. आयुष्य उद्ध्वस्त होऊ न देता ध्येयाच्या दिशेने जाण्यासाठी एकाग्रता तयार केलीत तर तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही. शॉर्टकटने कुणीही यशस्वी होत नाही, तर कष्ट करतील तेच यशस्वी होतील.
या मार्गदर्शनापूर्वी गणितचे अभ्यासक खेमांद्र पाटील यांनी स्पर्धा परीक्षा मागदर्शन आणि उपस्थित विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा घेतली. नीलेश सांबरे यांनी सांगितले की, जिजाऊ संस्था येथे जमिनी लुबाडण्यासाठी, उद्योग बंद करण्यासाठी आलेली नाही तर विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासाठी, त्यांना घडविण्यासाठी, गोरगरीब लोकांच्या न्याय हक्कांसाठी आलेली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 AM 08/Oct/2024














