संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील मुचरी येथील सोनवडे फाटा ते मुचरी घोटलवाडी येथील २ किलोमीटर रस्ता एक महिन्यात उखडला आहे. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो. गेल्या महिन्याभरात याठिकाणी दुचाकीचे अनेक अपघात घडून आले आहेत. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
सार्वजनिक विभागाकडून करण्यात आलेले बांधकाम काम दर्जाहीन असल्याचा आक्षेप ग्रामस्थांकडून घेतला जात आहे. या रस्तावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे या मार्गावरून वाहतूक करणे धोकादायक झाले आहे. गेल्या महिनाभरात याठिकाणी दुचाकी तसेच रिक्षा घसरून अपघात घडत आहेत. सुदैवाने मोठी दुखापत झालेली नाही. ही परिस्थिती असतानाही याकडे संबंधित विभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत मुचरी युवा सामाजिक संघटना आक्रमक झाली असून, संघटनेचे अध्यक्ष विलास वामन सुर्वे, उपाध्यक्ष विनोद मीरगळ, खंडेश कासार, सुरेश महाडिक, संतोष नागलेकर, बाळकृष्ण महाडिक, इम्रान झारी, नीलेश भालेकर, किशोर जाधव, संतोष मोरे, सिराज मापारी, आसिफ मापारी यांनी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून बुरंबी येथे रस्ता रोको करण्याचा निर्णय घेतलेला आहे. याबाबतचे पत्र बांधकाम विभागाला देण्यात आले आहे.
सुमार दर्जामुळे फटका
दोन महिन्यापूर्वी हे काम पूर्ण झालेले आहे. पावसाळ्यानंतर काम झालेले असल्याने वाहत्या पाण्यामुळे खड्डे पडले असाही दावा प्रशासनाला करता येणार नाही. सुमार दर्जाच्या कामामुळे ही वेळ आल्याचे युवा सामाजिक संघटनेकडून सांगण्यात आले. हा रस्ता दर्जेदार बनवा, अशी मागणी केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 AM 07/Apr/2025














