लांजा : लांजा नगरपंचायत प्रशासनाकडून जाहीर केलेल्या लांजा शहर विकास योजना आराखड्यावरून (डीपी प्लॅन) गोंधळ निर्माण झाला आहे. या आराखड्यामुळे सर्वसामान्य शेतकरी, नागरिकांचे मोठे नुकसान होईल, असा अंदाज बांधला जात आहे. याविषयी प्रशासनाकडून लवकरात लवकर या चर्चा करण्यासाठी बैठक बोलवावी अशी अशी मागणी होत आहे.
लांजा नगरपंचायत प्रशासनाकडून प्रारूप विकास योजना आराखडा (डीपी प्लॅन) जाहीर करण्यात आला आहे. २५ मार्चला आराखडा खुला करण्यात आला. २७ मार्चला नगरपंचायत कार्यालय येथे प्लॅनचा नकाशा नागरिकांना पाहण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आला. २८ एप्रिलपर्यंत त्यावर नागरिकांनी हरकती घ्याव्यात असे सांगण्यात आले. या हरकती नागरिकांना रत्नागिरी येथील कार्यालयात नोंदवायच्या आहेत. या डीपी प्लॅन मध्ये २८ मैदाने असून मोठमोठे रस्ते प्रस्तावित आहेत.
या रस्त्यांच्या कामांमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी किंवा घरेही जाण्याची भीती आहे. मात्र त्या संदर्भात नागरिकांना त्यांच्या जमिन जागेचा मोबदला मिळणार का याबाबत काहीच सांगितले जात नाही. अनेक ठिकाणी रस्त्यांमुळे जागांचे विभाजन होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागेल अशी स्थिती आहे. २०२२ पासून हा विकास आराखडा तसाच ठेवलेला होता. मात्र नगरपंचायतीचा कालावधी संपल्यानंतर प्रशासनाने स्वतःच्या मर्जीने तो आराखडा पुढील कार्यवाहीसाठी खुला केला. हा आराखडा सांताक्रुज (मुंबई) येथील टंडन अर्बन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने केला आहे. मात्र त्या कंपनीच्या कोणत्याही अधिकाऱ्यांकडून नागरिकांना डीपी प्लॅनबाबत मार्गदर्शन किंवा माहिती देण्यात आलेली नाही. नागरिकांना याविषयी माहिती द्यावी यासाठी कंपनीकडे पत्रव्यवहारही केला गेला होता.
कुवे ग्रीनझोनमध्ये
विकास आराखड्यात ग्रीन झोन दाखवण्यात आला आहे. कुवेसारखा ग्रामीण भाग या झोनमध्ये गेल्यामुळे ग्रामस्थांचे मोठे नुकसान होणार आहे. कुवे ग्रामपंचायत लांजा नगरपंचायतीत वर्ग करण्यात आल्याची मोठी चूक त्यात झाली आहे. शहरीकरणाचा फटका निश्चितच आम्हाला बसेल, अशी खंत कुवे ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
लांजा शहर विकास आराखड्यात ग्रीन झोन व अन्य विविध प्रकारचे झोन आहेत. मात्र या झोनबाबत लोकांना काहीही माहिती नाही. म्हणूनच लोकांनी या प्रारुप विकास योजनेसंदर्भात आपल्या हरकती नोंदवण्यासाठी पुढे यावे. लोकांनी वेळीच या संदर्भात हरकती न घेतल्यास त्यांना मोठ्यानुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. – नितीन शेट्ये, शहर नेते, ठाकरे शिवसेना
डीपी प्लॅन जाहीर करताना लांजा नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी, नागरिकांना कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन वा माहिती देण्यात आलेली नाही. या प्लॅनमध्ये असलेल्या विविध झोनमध्ये नागरिकांचे होणारे नुकसान किंवा फायदे, लोकांना त्यांच्या जमिनीचा मिळणारा मोबदला, तो मोबदला कमी-अधिक प्रमाणात आहे किंवा कसा काय? आदी सर्वच प्रश्नांबाबत नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे. त्यामुळे या संदर्भात नगरपंचायत प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही व्हावी. या प्रारूप विकास आराखड्याविषयी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. – संजय यादव, भाजप, माजी नगरसेवक
लांजा शहराचा डीपी प्लॅन आणि ग्रीन झोन हे शहरातील जनतेला अंधारात ठेऊन काम करण्यात आले. प्लॅन संदर्भात नगरपंचायत समोर बोर्ड आणि प्लॅन लावून कोणाचा हरकती असल्यास अर्ज करावा असे लिहिण्यात आले आहे, परंतु लांजा गाव हे वाडीवस्तीचे असून सर्वच लोक रोज बाजारपेठ येथे येणेजाणे नसून नगरपंचायत समोरील बोर्ड सर्वच वाचतील किंवा सर्वांना समजेल असेही नाही. त्यामुळे हरकत घेण्याची मुदत टळून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकांचे खूप नुकसान होणार आहे. सदर ग्रीन झोनबद्दल योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी उपाययोजना होणे आवश्यक आहे. अन्यथा आम्हाला संघटनेच्या माध्यमातून आंदोलनचा मार्ग स्वीकारावा लागेल. – सचिन सुधाकर लिंगायत, शहर सचिव, ठाकरे शिवसेना
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:24 07-04-2025













