मंडणगड : वेसवी पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे पंचायत समिती समोर आमरण उपोषण

मंडणगड : वेसवी येथे सुरू असलेली नियमबाह्य शाळेच्या विरोधात सोमवारी पंचायत समितीसमोर पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आमरण उपोषण केले. मात्र, कारवाईचे आश्वासन देण्यात आल्याने हे उपोषण स्थगित करण्यात आले.

वेसवी येथे एक नियमबाह्य शाळा सुरू आहे. याबाबत कोकण एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी बाणकोटतर्फे ७ ऑगस्ट रोजी पंचायत समितीकडे पत्र व्यवहार केला होता. या नियमबाह्य शाळेमुळे परिसरातील १५ ते १६ गावांतील जिल्हा परिषद शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत तरी संबंधित शाळा व संस्था चालकांवर कारवाई करून शाळा बंद करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती; मात्र गेल्या दीड महिन्यात गटविकास अधिकारी यांनी या विषया संदर्भात कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे विद्याथ्यांचे हितासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे.

याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी रत्नागिरी, जिल्हा पोलिस अधीक्षक, तहसीलदार मंडणगड, पोलिस निरीक्षक मंडणगड, पोलिस निरिक्षक बाणकोट यांना देण्यात आले होते. वेसवीतील मुनीरखान साखरकर, आनंद भाटे, इस्माईल उंडरे, सलीम हमदुले, अब्दुलसत्तार हजवाने, मकबुल अहमद नाडकर, लियाकत हजवाणे, शेखमोहम्मद ठंडरे, प्रवीण दरीपकर, बदरूद्दीन उंडरे आदी उपोषणाला बसले होते.

उपोषणास बसलेले ग्रामस्थ आणि गट शिक्षण अधिकारी नंदलाल शिंदे, गटविकास अधिकारी विशाल जाधव यांच्यामध्ये गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात चर्चा झाली. एक महिन्याच्या कालावधीत कारवाईचे आश्वासन यंत्रणेने दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले.

विस्तृत चौकशी अहवाल तयार करणार
गटशिक्षण अधिकारी नंदलाल शिंदे यांनी उपोषणास बसलेल्या ग्रामस्थांची भेट घेऊन जिल्हा शिक्षण अधिकारी माध्यमिक विभाग यांच्या आदेशानुसार शिक्षण विभागाकडून शाळेवर कारवाई करण्यात आली आहे. या संदर्भात ग्रामस्थांच्या तक्रारी लक्षात घेऊन विस्तृत चौकशी अहवाल तयार करण्यात येणार असल्याचे सांगीतले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 AM 08/Oct/2024