रत्नागिरी, चिपळूण, सावंतवाडी जंक्शन स्थानकात होणार आरपीएफ पोलिस चौकी

चिपळूण : कोकण रेल्वेमध्ये आर.पी.एफ. (पोलिस) आहेत. एखादा गुन्हा घडल्यानंतर आरपीएफ पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचा अधिकार नसल्याने जवळच्या पोलिस ठाण्यात आरोपीला घेऊन जावे लागते. यामध्ये खूप वेळ जातो व प्रवासात अनेक त्रुटींची पूर्तता करावी लागते. मात्र, आता रेल्वे स्थानकांवर आरपीएफ पोलिस चौकी असणार आहेत. त्यांनी स्थानकात व रेल्वे गाडीतील गुन्हेगारांना पकडून जंक्शन रेल्वे चौकीत गुन्हा दाखल करायचा आहे, अशी माहिती कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी दिली.

जंक्शन रेल्वे स्थानकाच्या लोह मार्गावर स्वतंत्र पोलिस चौकी असावी अशी मागणी खूप दिवसांपासून होती. त्याला आता कोकण रेल्वे व महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे. यामुळे माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, सावंतवाडी आदी जंक्शन रेल्वे स्थानकात पोलिस चौकी उभारण्यात येणार आहेत. यामध्ये चिपळूण हे जंक्शन रेल्वे स्थानक वगळण्यात आले होते. मात्र, समितीने याचा पाठपुरावा करून पोलिस चौकी मंजूर करून घेतली आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्था राखली जाणार आहे, असे मुकादम यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 AM 08/Oct/2024