राजापूर : गेल्या वर्षभरापासून शहरवासियांची डोकेदुखी ठरलेली भटक्या कुत्र्यांची समस्या सोडवण्यासाठी नगर पालिका प्रशासनाने भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण आणि लसीकरण करण्याची धडक मोहीम हाती घेतली आहे. त्यामध्ये मोकाट आणि झुंडीने फिरणाऱ्या या कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी कोल्हापूर येथील सोसायटी फॉर अॅनिमल प्रोटेक्शन या संस्थेची पथके शहरामध्ये कार्यरत असून, त्यांनी ८६ कुत्र्यांची नसबंदी आणि ८९ कुत्र्यांचे निर्बिजीकरण केल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
शहरामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये भटक्या कुत्र्यांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत होती. शहर आणि लगतच्या परिसरामध्ये कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी फिरत असताना दिसत होत्या. वाहनचालकांचा भटक्या कुत्र्यांकडून अनेकवेळा पाठलाग केला जातो. गेल्या वर्षभरापासून भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची मोहीम थंडावली होती; मात्र, भटक्या कुत्र्यांची दहशत दिवसागणिक अधिक वाढत चालली होती. त्यामुळे पालिकेने भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण आणि नसबंदी करण्याची मोहीम पुन्हा एकदा हाती घेतली आहे. सोसायटी फॉर अॅनिमल प्रोटेक्शन या संस्थेच्या पथकांनी शहरातील भटकी कुत्री पकडून त्यांचे निर्बिजीकरण आणि लसीकरण करण्याची मोहीम हाती घेतली आहे. भटक्या कुत्र्यांच्या विरोधात राबवण्यात येत असलेल्या या मोहिमेबद्दल लोकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:28 PM 08/Apr/2025














