रत्नागिरी : रत्नागिरीचा स्मार्ट सिटी म्हणून विकास करण्यासाठी ५९४ कोटींचा निधी देण्याचा निर्णय घेतला असून, तळोजाच्या धर्तीवर रत्नागिरीचा कायापालट होणार आहे. यासाठीचा डीपीआर ८ दिवसांत तयार केला आहे. एमआयडीसीचे पैसे डिपॉझिट म्हणून ठेवण्यापेक्षा ते लोकांसाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला असून, शाश्वत विकास सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला. रत्नागिरी होणार स्मार्ट सिटी कार्यक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. येथील स्वा. वि.दा. सावरकर नाट्यगृहात आयोजित कार्यक्रम पार पडला. ज्येष्ठ निवृत्त अभियंता नंदकुमार साळवी यांच्याहस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बार कौन्सिलचे अध्यक्ष अॅड. विलास पाटणे, एमआयडीसीचे अधीक्षक अभियंता कालिदास भांडेकर, अभियंता सचिन राक्षे, उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे, माजी जि.प. अध्यक्ष आबा घोसाळे, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडीत, महिला जिल्हाप्रमुख शिल्पा सुर्वे, शहरप्रमुख बिपीन बंदरकर यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रत्नागिरी स्मार्ट सिटी करताना शहरातील शाळा, तलाव, फुटपाथ विकसित करण्याबरोबरच ड्रेनेज सिस्टीम अधिक भक्कम करण्यावर भर दिला जाणार आहे.
शहराच्या विकासासाठी ५९४ कोटी देण्याचा निर्णय एमआयडीसीने घेतला आहे. मंजुर निधीपैकी ९१ कोटी रुपये शहरालगतच्या ग्रामीण भागात देण्यात येणार असून, यातून अंगणवाडी, उपकेंद्र, शाळा यांचा समावेश असणार आहे. आपण उद्योगमंत्री झाल्यानंतर एमआयडीसीच्या ठेवी डिपॉझिट ठेवण्याऐवजी त्या लोककल्याणकारी कामासाठी वापरण्याचा निर्णय घेतला. त्यातून महाराष्ट्रातील १९३ एसटी स्टॅण्डसाठी ५०० कोटी दिले. यातील रत्नागिरीसाठी २७ कोटीचा निधी देण्यात आल्याचे सांगितले. २००४ मध्ये मी आमदार झालो. मागील वीस वर्षे आपण प्रदूषणविरहीत उद्योग यावेत म्हणून प्रयत्न करीत होतो. परंतु तत्कालीन उद्योगमंत्र्यांनी लक्ष दिले नाही. परंतु उद्योगमंत्री झाल्यानंतर मतदार संघात २९ हजार कोटींचे दोन प्रदूषणविरहीत प्रकल्प आणल्याचेही उदय सामंत यांनी सांगितले. स्टरलाईटची जागा एमआयडीसीच्या ताब्यात येण्यासाठी ३० वर्ष लढा सुरु होता. परंतु आपण चांगले वकील दिले. त्यानंतर अडीच वर्षात हा प्रश्न मार्गी लागल्याचे त्यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 AM 08/Oct/2024














