चिपळूण : गुहागर विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा आपण निवडणूक लढविणार असून, आपला विजय निश्चित आणि सोपा असला तरी शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी गाफील राहू नये, या मतदारसंघात कोणीही कोणत्याही पक्षाचा असला तरी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणायचे असल्याने गाफील राहू नये, असे आवाहन आ. भास्कर जाधव यांनी शनिवारी (दि. ५) माटे सभागृहात आयोजित खास बैठकीत केले.
यावेळी या मतदारसंघात आपणच उभे राहाणार आहोत. विक्रांत जाधव या मतदारसंघातून लढणार याबाबत केवळ चर्चा असल्याचे निदर्शनास आणले. शहरातील माटे सभागृहात शनिवारी (दि. ५) सकाळी ११ वा. गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी या मतदारसंघातील तसे चिपळूण गुहागरमधील शिवसेनेचे प्रमख पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या बैठकीचे आयोजन केले होते.
गुहागर मतदारसंघामध्ये चिपळूण तालुक्यातील ७२ गावांचा समावेश आहे. या मतदारसंघातील ७२ गावांमध्ये आ. भास्कर जाधव यांच्यासह उद्धव सेनेचे मताधिक्य मोठे आहे. येथील कार्यकर्ते, पदाधिकारी हे सक्रिय आहेत. निवडणुकीचे वारे वाहू लागल्यावर गेले काही दिवस जि. प.चे माजी अध्यक्ष रिंगणात उतरणार व आ. जाधव हे चिपळूणमधून लढणार अशा चर्चांचे पेव फुटले होते. याबाबत सर्वच राजकीय पक्षांकडून व उद्धव सेनेतील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून या मतदारसंघात नक्की कोण लढणार, याबाबतची माहिती घेण्याचे काम सुरू झाले होते. मात्र, आ. जाधव यांनी शनिवारी आयोजित केलेल्या बैठकीत स्वतः लढणार असल्याचे स्पष्टीकरण देत विक्रांत जाधव लढणार या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:59 AM 08/Oct/2024














