रत्नागिरी : प्रधानमंत्री सूर्यघर योजना | जिल्ह्यात ६७५ ग्राहकांच्या घराच्या छतावर सोलर पॅनेल

रत्नागिरी : सौरऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून प्रधानमंत्री सूर्यघर योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातून या योजनेत सहभागी होण्यासाठी १,८१९ अर्ज प्राप्त झाले होते. पैकी ६७५ ग्राहकांच्या छतावर सोलर पॅनेल बसविण्यात आले आहेत. २.३२ मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे. एकूण ३७टक्केच कामाची पूर्तता झाली आहे.

घराच्या छतावर सौरऊर्जा निर्मिती पॅनेल बसविण्यात येते. त्यासाठी केंद्र शासनाकडून अनुदान देण्यात येते. ऊर्जानिर्मिती प्रकल्पाच्या क्षमतेनुसार एक किलोवॅटसाठी ३० हजार, दोन किलोवॅटसाठी ६०, तर तीन किलोवॅटसाठी ७८ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. या योजनेंतर्गत उत्पादित विजेचा वापर ग्राहक करू शकतात. उर्वरित वीज महावितरणला विकण्याची सुविधा आहे. तसेच उर्वरित वीज साठवून पावसाळ्याच्या दिवसात वापरता येते. दुहेरी फायदा असला तरी जिल्ह्याची एकूण लोकसंख्या विचारात घेता प्रतिसाद कमी आहे.

काय आहे योजना ?
प्रधानमंत्री सूर्यघर योजनेंतर्गत घराच्या छतावर सोलर पॅनेल बसवून वीजनिर्मिती करता येते. प्रकल्पाच्या क्षमतेनुसार शासनाकडून अनुदान दिले जाते.

महिन्याला लाखोंची बचत
जिल्ह्यातील ६७५ ग्राहकांनी सोलर पॅनेल बसविल्याने २.३२ मेगावॅट वीजनिर्मिती सुरू असून, लाखोंची बचत होते.

जिल्ह्यात सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प नाही
जिल्ह्यात सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प मात्र एकही नाही. केवळ सूर्यघर योजनेचे लाभार्थी आहेत.

प्रधानमंत्री सूर्यघर योजनेंतर्गत ग्राहकांना अनुदान देण्यात येते. घराच्या छतावर वीजनिर्मिती करून वापरता येते. उर्वरित वीज महावितरणला विकता येते किंवा पावसाळ्यात वापरता येते. या योजनेचा लाभ घेतलेल्या ग्राहकांची लाखो रुपयांची बचत होत आहे. जिल्ह्यातील सूर्यघर योजनेची कामे प्रगतीपथावर आहेत- वैभव पाथोडे, अधीक्षक अभियंता

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:38 PM 08/Apr/2025