रत्नागिरी : रत्नागिरीतील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रक्ताच्या एका थेंबावरून शरीरातील आजाराचा निष्कर्ष काढणारे मशिन उपलब्ध होणार आहे. हे ‘हेल्थ एटीएम किसॉक’ नामक मशिन पाच मिनिटांत ५० रुग्णांच्या तपासण्या करण्याची क्षमता ठेवणारे आहे. मुंबईसह कोकणात कुठल्याही रुग्णालयात हे मशिन उपलब्ध नाही. हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागात या मशिनद्वारे तपासणी शिबिरे घेतली जाणार असल्याचे हॉस्पिटलचे प्रकल्प व्यवस्थापक रवींद्र परदेशी यांनी सांगितले. रत्नागिरीतील मजगाव रोड येथे बाळ गंगाधर टिळक लो. मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे नुकतेच पालकमंत्री उदय सामंत यांनी लोकार्पण केले. ५० खाटा असलेल्या या हॉस्पिटलची सेवा कॅशलेस असून, ते पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी आणखी २० दिवस लागणार आहेत.
शासनाकडून रुग्णांना कुठल्या योजनेतून उपचार व इतर सेवा द्यायच्या, याचे निर्देश यायचे आहेत. हे निर्देश येण्यासह डॉक्टर्स व इतर स्टाफ रुजू होण्यासाठी हा कालावधी लागणार आहे. ग्रामीण भागात आर्थिक अडचणींमुळे आजार अंगावर काढले जातात. या पार्श्वभूमीवर तपासणी करणाऱ्या नवीन आधुनिक मशिनची सेवा ग्रामीण भागातही द्यावी, अशी सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी ट्रस्टला केल्या आहेत. ‘हेल्थ एटीएम किसॉक’ मशिनने लगेचच रिपोर्ट येत असल्याने छोटा आजार असताना कमी उपचारावर भागणार आहे. जागेवरच तपासणी रिपोर्ट मिळणार असल्याने मृत्यूवर नियंत्रण मिळवणे सोपे जाणार आहे.
हॉस्पिटल वॉर्डमध्ये शुद्ध हवा देणारे युनिट
मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये असे वॉर्ड आहेत की, त्या ठिकाणी एका रुग्णाच्या व्हायरसचा संसर्ग सोबतच्या रुग्णाला होणार नाही, अशी रचना आहे. वॉर्डमध्ये एअर व्हेंटिलेशन अँड एअर हॅण्डलिंग युनिट असून, ते वॉर्डमधील व्हायरस, बॅक्टेरिया बाहेर काढते आणि बाहेरील शुद्ध हवा आतमध्ये घेते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:31 PM 08/Oct/2024














