चिपळूण : चिपळूण शहरातील तापमानात सलग दुसऱ्या दिवशीही वाढ झाली आहे. यंदा एप्रिलमध्ये प्रथमच पारा चाळीशी पार गेला असून, बुधवारी (ता. ९) चिपळूणमधील कमाल तापमान ४०.३ अंश सेल्सिअस नोंदले गेले आहे. उन्हाच्या कडाक्यामुळे दुपारी नागरिकांनी बाहेर जाणे टाळले. त्यामुळे शहरातील रस्त्यावर गर्दी कमी होती कोकण कृषी विद्यापीठाकडून आलेल्या अंदाजानुसार, कोकण विभागात १३ ते १९ एप्रिलदरम्यान पावसाची शक्यता आहे.
चिपळुणात सकाळी नऊ वाजल्यापासूनच उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. दुपारच्या सुमारास उन्हाचा तडाखा आणखी वाढतो. उन्हाच्या तीव्रतेमुळे काम असेल तरच नागरिक घराबाहेर फिरताना दिसत होते. त्यामुळे रस्त्यावरही तुरळक गर्दी होती. बाहेर पडणारे नागरिकही टोपी, स्कार्फ, सनकोट, गॉगल असा पेहराव करूनच बाहेर पडत होते. उन्हामुळे अंगाची काहिली होत असल्याने नारळपाणी, थंड पेय, सरबत, ताजी फळे यांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. हीच परिस्थिती कमी-अधिक प्रमाणात अन्य तालुक्यांतही जाणवत आहे. रत्नागिरी शहरामध्येही दुपारच्या सुमारास मुख्य रस्त्यावर वाहनांची गर्दी दिसत आहे; मात्र दुचाकीच्या तुलनेत चारचाकी वाहनांचे प्रमाण वाढलेले आहे.
कोकण कृषी विद्यापीठाकडून आलेल्या अंदाजानुसार, कमाल तापमान पुढील पाच दिवस सरासरीपेक्षा कमी राहील. या कालावधीत कमाल तापमान ३४.८ डिग्री सेल्सिअस एवढे असते, तरी यंदा ते ३३.१ डिग्री सेल्सिअसएवढे राहण्याची शक्यता आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 AM 10/Apr/2025














