शेतकऱ्यांचा लांज्यात अभ्यास दौरा

लांजा : लांजा तालुका काजू फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या कार्यालयात काजू बोर्ड वेंगुर्लेअंतर्गत दिगंत स्वराज फाउंडेशनतर्फे पालघर जिल्ह्यातील मोखाडा आणि जव्हार तालुक्यांतील काजू लागवड करणारे शेतकरी हे अभ्यास दौऱ्यासाठी लांजा येथे आले होते. लांजा तालुक्यातील काजू उत्पादन आणि तेथील प्रक्रिया उद्योगाविषयी त्या सर्व शेतकऱ्यांनी माहिती जाणून घेतली. तसेच काजू फार्मर कंपनीच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्यांशी संवाद साधला.

काजू बोर्डाच्या संलग्न असणाऱ्या दिगंत संस्थेमार्फत जिल्ह्यात १ हजार काजू रोपांचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच संगोपनासाठी शेतकऱ्यांना मोफत काजू रोपे दिली जाणार आहेत. ही लागवड पावसाळ्यात केली जाणार आहे. संस्थेच्या या उपक्रमाला चला जाणूया नदीला अभियानांतर्गत रत्नागिरी जिल्हा समितीचे सदस्य- समन्वयक, नदी प्रहरी आणि ब्रह्मांड सेवा संवर्धन फाउंडेशन संस्थेचे उपमुख्याधिकारी रोहन इंगळे सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

पालघर जिल्हा दिगंत स्वराज फाउंडेशन संस्थेचे कृषी विभागप्रमुख कमलाकर बुरंगे आणि सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हाप्रमुख आदित्य सावंत, काजू फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संस्थापक जयेश माजळकर यांच्या उपस्थितीत पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील ओल्या व सुक्या दुष्काळाविषयी चर्चा केली. पाणी संवर्धन आधारित विविध उपक्रम स्थानिक जिल्हा प्रशासन यंत्रणेच्या सहकार्याने ठिकठिकाणी राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 AM 10/Apr/2025