चिपळूण : माथाडी कामगार कायद्यातील दुरुस्तींच्या विरोधात राज्यभर तीव्र आंदोलन केले जाणार आहे. कोकणातील आंदोलनाचे केंद्रबिंदू चिपळूण असणार आहे.
शासनाने केलेल्या अन्यायकारक असलेल्या दुरुस्त्या रद्द न केल्यास राज्य माथाडी हमाल कृती समितीच्यावतीने राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय पुण्यात झालेल्या कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी कोकण विभागाची बैठक चिपळूणमध्ये घेतली जाणार आहे. मे महिन्यात होणाऱ्या या बैठकीसाठी कोकणातील १५ हजार माथाडी कामगार सहभागी होणार आहेत, अशी माहिती माथाडी कामगार संघटनेचे चिपळूण तालुकाध्यक्ष अनिल शिंदे यांनी दिली.
ते म्हणाले, राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात माथाडी कायद्यात शासनाने केलेल्या दुरुस्त्या निवडक उद्योगपतींना खूष करणाऱ्या आहेत. या दुरुस्त्यांमुळे माथाडी कायदा दुबळा होत आहे. तोलणार, हमाल या कष्टकऱ्यांना अन्यायकारक असलेल्या या दुरुस्त्या रद्द न केल्यास राज्य माथाडी हमाल कृती समितीच्यावतीने राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय पुण्यात झालेल्या कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य हमाल माथाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत माथाडी कायद्यामध्ये करण्यात आलेल्या दुरुस्त्यांबाबत चर्चा करण्यात आली. याबाबतचे विधेयक विधानसभा आणि विधानपरिषदेत मंजूर झाले असले तरी या दुरुस्त्यांमध्ये संदिग्धता आहे.
मशीनची मदत म्हणजे काय ?
मशीनच्या मदतीने केलेल्या कामाला माथाडी कायदा लागू होणार नाही. यात मशीन म्हणजे काय, याचा तपशील नाही. हातगाडी, वजन मापक हे सुद्धा यंत्राचेच प्रकार आहेत. ते मशीन मानले तर राज्यातील हजारो तोलाई काम करणारे तोलणार, हातगाडीवर धान्याची पोती चढवून त्या मालाची हातगाडीच्या मदतीने वाहतूक करणारे हमाल हे माथाडी कायद्याच्या आणि माथाडी मंडळाच्या बाहेर फेकले जातील. त्यांना मंडळाचे कोणतेही कल्याणकारी लाभ मिळणार नाहीत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 AM 10/Apr/2025










