रत्नागिरी : येथील पालिकेतर्फे राबविण्यात आलेल्या घरपट्टी, पाणीपट्टी वसुली मोहिमेला यश आले असून, आतापर्यंत ८० टक्के वसुली पूर्ण झाली असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
रत्नागिरी शहरात ३१ हजार मालमत्ताधारक असून, त्यांच्याकडील १४ कोटी रुपये घरपट्टीची रक्कम वसूल करण्याचे उद्दिष्ट होते. पैकी ११ कोटी २३ लाख रुपये वसूल करण्यात प्रशासनाला यश आले आहे. घरपट्टी न भरणाऱ्या मालमत्ताधारकांवर कारवाईचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार शहरातील १२४ मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत.
आर्थिक वर्ष संपले असले तरी पालिकेतर्फे वसुली मोहीम न थांबवता सुरू ठेवणार असल्याचे सांगण्यात आले. शहरात एकूण आठ पथके वसुलीसाठी कार्यरत होती. घरपट्टी न भरणाऱ्या मालमत्ताधारकांवर कारवाई म्हणून मालमत्ताच सील केली आहे.
शहरातील नागरिकांकडे अद्याप घरपट्टीची दोन कोटी ७७ लाखांची थकबाकी शिल्लक आहे. वसुलीसाठी पथक कार्यरत आहे. घरपट्टीबरोबरच नागरिकांना पाणीपट्टी भरण्याचे आवाहन करण्यात आले होते.
पाणीपट्टीची रक्कम थकवणाऱ्या शहरातील एकूण १७२ जोडण्या तोडण्यात आल्या आहेत. पाणीपट्टीची रक्कम भरल्यास तोडलेल्या जोडण्या पूर्ववत जोडून देणार असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.
घरपट्टी थकल्यानेच मालमत्ता सील
नागरिकांनी घरपट्टी, पाणीपट्टीची रक्कम वेळत भरणे अनिवार्य आहे; मात्र काही नागरिक जाणूनबुजून रक्कम थकवतात. थकबाकीदारांवरही कारवाई करण्यात येत आहे. घरपट्टी वर्षानुवर्षे न भरल्यामुळे थकबाकीची रक्कम वाढली असल्यानेच मालमत्ता सील केल्या आहेत, असे मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:13 PM 10/Apr/2025












