चिपळूण : शहरातील अत्यंत महत्त्वाचा आणि वाहतुकीवर उत्तम पर्याय ठरणारा पेठमाप-मुरादपूर पुलाच्या कामाने पावसाळ्यानंतर पुन्हा एकदा गती घेतली आहे. या पुलाचे मार्चपूर्वी जास्तीत जास्त काम मार्गी लावण्यासाठी ठेकेदार कंपनीकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. पिलरवर गर्डर चढविण्याचे कामही आता अंतिम टप्प्यात आले आहे.
चिपळूण शहरातील पेठमाप आणि मुरादपूर ही दोन मोठी लोकवस्ती असणारे भाग वाशिष्ठी नदीमुळे विभागलेली आहेत. इंग्रजांच्या काळात येथे फरशी बांधण्यात आली होती. ओहटीच्यावेळी या फरशीवरून वाहतूक केली जात होती. काही प्रमाणात ती फरशी अस्तित्वात असून त्यावरून हलकी वाहने ये-जा करतात. परंतु भरतीच्या वेळी तसेच पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहामुळे येथील वाहतूक तसेच येण्या-जाण्याचा मार्ग बंद पडतो. त्यामुळे येथे पूल व्हावा, अशी मागणी नागरिक कित्येक वर्ष करत होते. या मागणीची दखल घेत आमदार शेखर निकम यांनी मुरादपूर-पेठमाप असा पूल शासनाकडून मंजूर करून घेतला. त्यासाठी सुमारे १२ कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहेत.
गेल्या काही वर्षांपासून या पुलाच्या काम सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी १४ पिलरचे काम पूर्ण करण्यात आले होते. त्यानंतर आता पावसाचा जोर कमी होताच पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. आता पुलाच्या गर्डर चढविण्याचे काम सुरू आहे. हे कामही लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. गर्डरचे काम पूर्ण होताच पुलावरील उर्वरित स्लॅबचे व रेलिंगचे काम हाती घेतले जाणार आहे. या पुलावर एकूण ६० गर्डर चढविले जाणार आहेत.
आतापर्यंत ४६ गर्डर चढविण्यात आले आहेत. हा पूल सुरू झाल्यास मुरादपूर, पेठमाप, दादर मोहल्ला, बेबल मोहल्लासह शहरातील बहुतांशी भाग जोडला जाणार आहे. त्यातून शहरातील अंतर्गत वाहतुकीसाठी एक उत्तम पर्याय उपलब्ध होऊन वाहतूक कोंडीची समस्यादेखील सुटण्यास मदत होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:53 PM 08/Oct/2024














