चिपळुणात ‘प्लास्टर ऑफ पॅरिसच्या’च्या मूर्तीवर बंदी

चिपळूण : गणेशोत्सव काळात चिपळूणमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनविणे आणि त्याची विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मूर्ती कारखानदार व प्रशासनाने काटेकोर पालन करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे चिपळूण पालिका कार्यक्षेत्रातील मूर्ती कारखानदारांची बैठक मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या उपस्थितीत पार पडली.

या बैठकीमध्ये शहरातील मूर्ती कारखानदार यांना मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी जनहित याचिकेमधील मार्गदर्शक तत्त्वांचे विश्लेषण केले. तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जारी केलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे उत्पादन, विक्री आणि विसर्जनाबाबत मार्गदर्शक तत्त्वांची माहिती दिली. ज्याप्रमाणे न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे आवश्यक आहे त्याप्रमाणे या आदेशाला पालिकेकडून आवश्यक असणारी मदत पालिका मूर्तिकारांना करेल, अशी ग्वाही मुख्याधिकाऱ्यांनी दिली. यावेळी सर्व कारखानदारांची मते त्यांनी जाणून घेतली.

बैठकीवेळी मूर्तिकार किशोर पांचाळ, घनशाम नरळकर, गोविंद कदम, अनंत महाजन, रणवीर सावंत, राजेंद्र माजलेकर, विजय सागवेकर, सुनील बांदेकर, अजित सावंत, रवींद्र आंबुर्ले, राजेश कदम, सिद्धेश डेरे, मिलिंद कदम मुख्याधिकारी विशाल भोसले, मंगेश पेढांबकर, सागर शेडगे, महेश जाधव, सुजित जाधव, वैभव निवाते आदी मूर्तीकार उपस्थित होते.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवरील बंदीमुळे पर्यावरणास हानी पोहोचणार नाही तसेच जलप्रदूषणाला प्रतिबंध होण्यास मदतच होईल आणि शाडूची माती पाण्यात पूर्णपणे विरघळल्यामुळे मूर्तीची विटंबना होणार नाही. – सुनील बांदेकर, मूर्तिकार, चिपळूण

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:59 PM 10/Apr/2025