चिपळूण : तालुक्यातील कापरे-भेलवणे येथील साठवण तलावाच्या भूसंपादन प्रक्रियेचे काम गेल्या ६ वर्षापासून रखडलेले असून, या प्रश्नी पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने अखेर १ मेपासून येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा प्रकल्पग्रस्त भूधारक शेतकऱ्यांनी दिला आहे.
प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात ग्रामस्थांनी म्हटले आहे की, या प्रकल्पाचे ऑक्टोबर २०१९ पासून सुरू झालेले भूसंपादन मागील ६ वर्षे रखडले आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे न्याय मागितल्यावर खासगी वाटाघाटीने थेट खरेदीने भूसंपादन करावे, असा खरेदीचा प्रस्ताव जानेवारी २०२४ मध्ये पाठवला गेला; मात्र यामध्ये भूसंपादन करण्यास जाणूनबुजून व्यत्यय आणला जात आहे. १०० टक्के संमतीपत्रे झाल्याशिवाय पुढील काम करता येत नाही. जोपर्यंत प्रस्ताव १०० टक्के पूर्ण होत नाही, तोपर्यंत जिल्ह्याला पाठवणार नाही, असे प्रांताधिकारी सांगत आहेत. आता ग्रामस्थांच्या मागण्यांची दखल घेतली गेली नाही तर १ मेपासून उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
ग्रामस्थांच्या मागण्या
आजपर्यंत ७९७ भूधारकांपैकी ६६७ भूधारकांची संमतीपत्रे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे १ मेपर्यंत संमतीपत्र पूर्ण झालेल्या भूधारकांना मोबदला द्यावा.
मृद व जलसंधारण चिपळूण २ उपविभागीय अधिकारी यांनी ऑक्टोबर २०१९ ते एप्रिल २०२३ या कालावधीत भूसंपादन अपूर्ण ठेवून ठेकेदारांना २२ कोटींचे बिल अदा केल्याबद्दल त्यांची विभागीय चौकशी लावून ते दोषी आढळल्यास कारवाई करावी.
ऑक्टोबर २०१९ मध्ये आमची संमती नसताना आमच्या जमिनी ताब्यात घेऊन बेकायदेशीरपणे जमिनीचे उत्खनन करून त्यातील झाडे तोडत सर्व संबंधित अधिकारी व ठेकेदाराने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याबद्दल त्यांच्यावर खातेनिहाय चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:35 PM 10/Apr/2025














