मुंबई : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची त्रैमासिक सभा आणि आद्य मराठी पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यासाठी विशेष सभा १७ मे २०२५ रोजी सिंधुदुर्ग येथील बाळशास्त्री जांभेकर स्मारकात आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, विश्वस्त किरण नाईक, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख आणि कोकण विभागीय उपाध्यक्ष हेमंत वणजू, मनोज खांबे तसेच सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांनी केले आहे.
त्रैमासिक सभेचा कोकणातील दुसरा टप्पा
मराठी पत्रकार परिषदेने दर तीन महिन्यांनी राज्याच्या विविध भागांत विस्तारित कार्यकारिणीच्या सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार पहिली सभा १६ मार्च २०२५ रोजी नांदेड येथे पार पडली होती. आता दुसरी सभा कोकणातील सिंधुदुर्ग येथे होणार आहे. या बैठकीत नांदेड येथे घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी आणि पुढील कार्ययोजनेवर चर्चा होणार आहे.
कधी आणि कुठे?
१७ मे २०२५, सकाळी १० वाजता, बाळशास्त्री जांभेकर स्मारक, सिंधुदुर्ग.
कार्यक्रम: सकाळी “बाळशास्त्री जांभेकर अभिवादन” सभा, दुपारी परिषदेची मुख्य बैठक.
बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
१७ मे हा दिवस बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुण्यतिथीचा आहे. मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी सकाळी १० वाजता विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. या निमित्ताने परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना बाळशास्त्री जांभेकर स्मारकाला भेट देण्याची संधी मिळणार आहे.
कोण-कोण उपस्थित राहणार?
या सभेसाठी परिषदेचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी, उपाध्यक्ष, विभागीय सचिव, जिल्हा अध्यक्ष, डिजिटल मिडिया परिषदेचे प्रतिनिधी, अधिस्वीकृती समितीवरील सदस्य आणि राज्य तसेच जिल्हा प्रसिद्धी प्रमुख यांना निमंत्रित करण्यात आले आहे. सर्वांनी बैठकीस हजर राहणे आवश्यक असल्याचे परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
प्रवास आणि निवासाची व्यवस्था
उन्हाळ्याच्या काळात गाड्यांना होणारी गर्दी लक्षात घेता, प्रतिनिधींना अगोदरच रिझर्वेशन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. प्रतिनिधींची निवास व्यवस्था सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने करण्यात आली असून, याबाबत अधिक माहितीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
“ही सभा मराठी पत्रकारितेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून आपले योगदान द्यावे,” असे परिषदेचे कार्याध्यक्ष शिवराज काटकर आणि कोकण विभागीय सचिव मनोज खांबे यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:36 10-04-2025













