गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी क्रमांक २ ते तिसंग बौद्धवाडी हा सुमारे १ कि.मी. रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
गेले चार महिने झाले हा रस्ता एम.आय.डी.सी मार्फत डांबरीकरण करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांमधून सांगितले जात आहे; मात्र पावसाळा सुरू होण्यास काही कालावधी असताना अद्याप डांबरीकरणाबाबत कोणतीच कार्यवाही दिसून आलेली नाही. संपूर्ण रस्त्यावर दगडांचे साम्राज्य पसरले आहे. दुचाकी, रिक्षा, चारचाकी गाड्यांसह बस, ट्रक सारख्या मोठ्या गाड्यांना ही प्रचंड हादरे बसत आहेत.
या मार्गावरील एस.टी. वाहतूक बारमाही सुरू असते. हा दिवसेंदिवस वाहतुकीसाठी भयानक बनत असून याचा फटका प्रवासी, शालेय विद्यार्थ्यांना, बालके, वृध्दांना बसत आहे. वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. येत्या चार दिवसांत कळझोंडी क्र. २ ते कळझोंडी तिसंग (दि. गोविंद गोजू पवार) मार्गाचे मजबूत डांबरीकरण सुरू करण्यात आले नाही तर महाराष्ट्र दिनाच्या दिवशी तीव्र आंदोलनाचा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 AM 11/Apr/2025











