ST Employee : एसटी कर्मचाऱ्यांचे उर्वरित 44 टक्के वेतन येत्या मंगळवारपर्यंत मिळणार

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित 44 टक्के पगार येत्या मंगळवार पर्यंत देण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेऊन वित्त सचिवांशी केलेल्या चर्चेअंती एसटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन लवकरच अदा करण्याची त्यांनी तयारी दर्शवली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचे फक्त 56 टक्के वेतन मिळाल्याचे वृत्त पसरल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती. सांगोला तालुक्याच्या दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री शिंदे यांची काही एसटी कर्मचाऱ्यांनी भेट घेऊन आपले उर्वरित वेतन लवकरच देण्याची मागणी केली होती.

या मागणीची तत्काळ दखल घेऊन या प्रश्नावर शिंदे यांनी राज्याचे वित्त सचिव ओमप्रकाश गुप्ता यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या चर्चेअंती एसटी कर्मचाऱ्यांचे या महिन्याचे उर्वरित 44 टक्के वेतन येत्या मंगळवारपर्यंत अदा करण्यात येईल असे गुप्ता यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या पुढाकाराने एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असून त्यांच्यावरील वेतन कपातीचे संकट दूर होण्यास मदत झाली आहे.

एस टी कर्मचाऱ्यांची कैफियत

– एस टी कर्मचाऱ्यांचा 2018 पासूनचा महागाई भत्ता अजून दिलेला नाही
– भत्ता एकरकमी द्या असे हायकोर्टाचे आदेश असूनही भत्ता नाही
– सध्या कर्मचाऱ्यांचा 56 टक्के महागाई भत्ता थकीत
– मार्च महिन्याचा पगार 56 टक्केच दिला, इतिहासात पहिल्यांदाच पगारात कपात
– कर्मचाऱ्यांचे पगार सात तारखेला होत नाहीत, कधी 8, कधी 9, कधी 10 तारखेला होतात.
– एसटी दैनंदिन फायद्यात, रोज सरासरी 22 कोटी उत्पन्न म्हणजे महिन्याला 660 ते 700 कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न गेलं आहे.
– एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी महिन्याला 440 कोटी रुपये लागता, उत्पन्न 700 कोटी असताना पगार का नाही
– ज्येष्ठ नागरिक, महिला अशा विविध 36 प्रकारच्या लोकांना एसटीच्या तिकिटांत सवलती, त्या सवलतीची भरपाई सरकार करत नाही
– घरभाडं तालुकास्तरावर 8 टक्के असूनही 7 टक्केच दिले जातेय, पण तेसुद्धा कर्मचाऱ्यांना वेळेवर दिलं जातं.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:32 11-04-2025