खेड : गेल्या कित्येक वर्षापासून खेड तालुक्यात उन्हाळ्यात भेडसावणारी पाणीटंचाई दूर करण्यात लोकप्रतिनिधी व शासकीय यंत्रणा यांना अपयश आल्याचे यावर्षी देखील स्पष्ट झाले आहे. ७ एप्रिल पासून तालुक्यात पहिला टँकर घेरारसाळगड-बुथराईवाडी येथे धावला आहे. खेड तालुक्याला एप्रिल सुरुवात होताच पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. कोट्यवधींच्या पाणी योजना या तालुक्यात राबवून देखील अनेक ठिकाणाहून टँकरने पाणी पुरवठा करा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
मात्र गेल्यावर्षी मागणी होऊन देखील पाणी पुरवठा करण्याची प्रक्रिया सुरू झाली नव्हती. गेले ६ दिवस घेरा रसाळगड येथील ग्रामस्थ टँकरची वाट पाहात होते. अखेर सोमवारी ग्रामस्थांना दिलासा मिळाला. आगामी दोन ते तीन दिवसातच खवटी खालची धनगरवाडी येथेही टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. अजूनही ४ वाड्यांतील ग्रामस्थ टँकरच्या प्रतीक्षेत आहेत.
कोकणात एका बाजूला अवकाळी पाऊस तर दुसरीकडे रणरणत्या उन्हामुळे आटलेले जलस्त्रोत अशी विषम परिस्थिती आहे. घेरारसाळगड बुथराईवाडीतील ग्रामस्थांना टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडून दाखलाही प्राप्त झाला होता. यासाठी ग्रामस्थांना ६ दिवस प्रतीक्षा करावी लागली. अखेर पंचायत समितीने सोमवारी घेरा रसाळगड – बुधराई वाडीतील ग्रामस्थांसाठी पाण्याचा पहिला टँकर पाठवला. चिरणी धनगरवाडी, वावेतर्फे ढेबेवाडी, खवटी-खालची धनगरवाडी येथे ग्रामस्थ टैंकर ने पाणी द्या, अशी मागणी करत आहेत.
परंतु प्रशासनाकडून पाहणी करून त्यांना टँकर मिळे पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. पाण्या सारख्या जीवनावश्यक गोष्टीसाठी देखील शासन दरबारी वेटींग लिस्ट असेल तर आपण संवेदनशीलता हरवली आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. याकडे राज्याचे गृहराज्य मंत्री तथा खेडचे आमदार योगेश कदम यांनी तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:33 AM 11/Apr/2025














