दापोली वडाचाकोंड येथील उंच गतिरोधकांमुळे अपघाताची शक्यता?

दापोली : दापोली-दाभोळ या मुख्य मार्गावरील नगरपंचायत हद्दीतील स्टेट बँक ऑफ इंडिया ते वडाचा कोंड परिसरातील रस्त्याचे काम सुरु आहे.

या सुमारे अर्धा कि.मी. मार्गावर दोन उंच स्पीड ब्रेकर टाकण्यात आले असून अशा प्रकारच्या स्पीड ब्रेकरमुळे वाहनांना दणका मिळून अपघाताची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. वाहन चालकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून असे स्पीड ब्रेकरची उंची कमी करावी अशी मागणी करीत आहेत.

दापोली-दाभोळ या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे वाहनेदेखील मोठ्या प्रमाणात येत असतात. केवळ अर्धा कि.मी.च्या अंतरातमध्ये दोन गतिरोधक टाकण्यात आले असून, हा प्रकार अनाकलनीय आहे, अशी चर्चा देखील सुरू आहे. इंडियन रोड काँग्रेसच्या नियमावलीप्रमाणे, स्पीड ब्रेकरला जास्तीत जास्त 25 किमी प्रतितास वेगाने वाहने जाण्यासाठी सक्षम करण्यासाठी 3.7 मीटर रुंदीची आणि 0.10 मीटर उंचीची गोल कुंप असावी. एका ब्रेकर आणि दुसऱ्या दरम्यानचे अंतर किमान 100 ते 120 मीटर असले पाहिजे, सुरवातीलाच दर्शक फलकासह गतिरोधकाच्या अस्तित्वाचा इशारा वाहनचालकांना देण्यात यावा. चेतावणी चिन्ह कुबड किंवा उग्र स्त्यासारखे दिसले पाहिजे. फलकावर ‘गतिरोधक ‘ असले पाहिजे. रस्त्यावर त्याचे दृश्यमानता वाढविण्यासाठी स्पीड ब्रेकर्सकडे काळा आणि पांढरा वैकल्पिक पट्टे असावेत. ह्या नियमावलीनुसार असणे आवश्यक आहेत.

दरम्यान, या गतिरोधकांना स्लोप देऊन उंची कमी करणे आवश्यक आहे, असे मत वाहनचालक यांनी व्यक्त केले तर उंच गतिरोधक हे पर्यटक आणि नागरिकांसाठी धोकादायक असल्याने संबंधित ठेकेदाराला सांगून यावर त्वरित उपाययोजना करावी. एखादा मोठा अपघात झाल्यास जबाबदार कोण? अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर यांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:59 11-04-2025