खेड : खेड तालुक्यातील आपेडे फाटा येथे गोवा-मुंबई दुपदरी रस्त्यावर शुक्रवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास एका रस्ता अपघातानंतर एसटी बस चालकाला मारहाण करण्याचा गंभीर प्रकार घडला. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सकाळी खेड बसस्थानकातून आंबेजोगाईकडे जाणारी एसटी बस (क्र. एपी ६१६५) प्रवासी घेऊन भरणे नाका मार्गे गोवा-मुंबई दुपदरी रस्त्यावरून माणगावच्या दिशेने निघाली होती. बस चालक आकाश विठ्ठल चौरे (वय २७, रा. एसटी डेपो रेस्ट रूम, गोळीबार मैदान, खेड) यांच्या ताब्यातील बस आपेडे फाट्याजवळ आली असताना, समोरून येणारी मारुती कार (क्र. एमएच ०६ सीपी ६००६) चालक रोहन राजेश टेमकर याने ट्रकला ओव्हरटेक करताना अचानक बसच्या लेनमध्ये प्रवेश केला. यामुळे बस आणि कार यांच्यात किरकोळ धडक झाली, ज्यामुळे कारचा मागील इंडिकेटर फुटला.
या किरकोळ अपघातानंतर कार चालक रोहन राजेश टेमकर याच्यासह त्याचे साथीदार मितेश राजेश टेमकर आणि दर्शन जयवंत मयेकर (सर्व रा. पोयनाड, ता. अलिबाग) यांनी बस चालक आकाश चौरे यांना शिवीगाळ आणि दमदाटी सुरू केली. इतकेच नव्हे, तर त्यांनी चालकाला डोक्यावर, गालावर, मानेवर आणि हातावर ठोसे व थपडा मारून जखमी केले. यावेळी चालक आपले कर्तव्य बजावत होता, तरीही त्याला अटकाव करून मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.
या घटनेची तक्रार फिर्यादी आकाश चौरे यांनी खेड पोलीस ठाण्यात नोंदवली. यानुसार, शुक्रवारी दुपारी ४:४९ वाजता गुन्हा क्रमांक ९८/२०२५ नोंदवण्यात आला. भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम २८१ (बेदरकार वाहन चालवणे), १३२ (कामात अटकाव करणे), आणि २२१ (मारहाण) अंतर्गत आरोपी रोहन राजेश टेमकर, मितेश राजेश टेमकर आणि दर्शन जयवंत मयेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 12-04-2025
