राजापूर : ‘जामदा’ प्रकल्पासाठी चुकीच्या पद्धतीने घरांचे मूल्यांकन- प्रकल्प संघर्ष समितीचा आरोप

राजापूर : तालुक्यातील काजिर्डा आणि राणेवाडी येथील जामदा प्रकल्पाचे काम गेल्या दोन दशकांपासून रडतखडत पद्धतीने सुरू आहे. अशा स्थितीमध्ये घराचे मूल्यांकन करतेवेळी जाहीर नोटीस प्रसिद्ध करून बुडीत क्षेत्रातील मोजणीची फी भरणे त्यानंतर पुनर्वसन अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सर्व विभागातील अधिकाऱ्यांसमोर संयुक्त मोजणी करणे बंधनकारक असताना पाटबंधारे विभागाकडून चुकीच्या पद्धतीने घरांचे मूल्यांकन केले जात आहे. ते तत्काळ थांबवावे, अशी मागणी जामदा प्रकल्प संघर्ष समितीने कोकण पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी संचालकांकडे निवेदनाद्वारे केली केली आहे.

या प्रकल्पामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पाच्या कामामध्ये फारशी प्रगती नसताना प्रकल्पामुळे विस्थापित होणाऱ्या काजिर्डा आणि राणेवाडी येथील सुमारे १ हजार ७०० कुटुंबांच्या पुनर्वसनाबाबत गेल्या सुमारे २९ वर्षांमध्ये शासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.

दोन महिन्यांपूर्वी प्रकल्पग्रस्तांची मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्यासमवेत झालेल्या बैठकीनंतर प्रकल्पग्रस्तांच्या मालमत्तेचे मुल्यांकन आणि पुनर्वसनाबाबत प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या.

त्यामध्ये मोजणी आणि प्रकल्पग्रस्तांच्या मालमत्तेचे मूल्यांकन पाटबंधारे विभागाकडून चुकीच्या पद्धतीने केले जात आहे. याकडे जामदा प्रकल्प संघर्ष समितीने कोकण पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी संचालकांचे लक्ष वेधले आहे.

संयुक्त मोजणीच्या नोटिसीमध्ये गावठाण आणि नागरिक सुविधांचा कोणताही उल्लेख नसून, शासकीय पुनर्वसनाबाबत गावातील सर्व कुटुंबांचे नियोजन व पुनर्वसन आराखडा संकलन रजिस्ट्रर, प्रत्येक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा निवाडा शासनाकडून स्पष्ट होणे गरजेचे आहे; मात्र प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घेऊन तशी कोणतीही कार्यवाही होत नसल्याचे समितीने निवेदनात म्हटले आहे.

प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घेऊन भूसंपादन आणि पुनर्वसनाबाबत कोणतीही कार्यवाही होत नसल्याकडे जामदा प्रकल्प संघर्ष समितीने कोकण पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी संचालकांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. त्याची तत्काळ दखल घेत त्यांनी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता यांना जोपर्यंत संकलन यादी आणि निवाडा तयार होत नाही तोपर्यंत भूसंपादनाचे आणि मोजणीचे काम थांबवण्यात यावे, अशी सूचना दिली आहे –विकास घाग, जामदा प्रकल्प संघर्ष समिती काजिर्डा -राणेवाडी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 AM 12/Apr/2025