रत्नागिरी, १२ एप्रिल 2025 : माजी खासदार विनायक राउत यांनी आज रत्नागिरी दौऱ्यादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना राज्यमंत्री नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली. दोन दिवसांपूर्वी नितेश राणे यांनी “नारायण राणेंना अटक केल्याची व्हीडिओ क्लीप अजूनही माझ्या मोबाईलमध्ये आहे, बदला घेतल्यानंतरच ती डिलीट करेन,” असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावर प्रतिक्रिया देताना विनायक राउत यांनी नितेश राणेंना खडेबोल सुनावले.
“स्वप्न बघत रहा! खूप मोठ्याने डराव-डराव करून बेडूक उड्या मारण्याची सवय असणारे नितेश राणे आपल्या उंचीप्रमाणेच बोलतात. त्यांना आम्ही फारशी किंमत देत नाही,” असे राउत म्हणाले. त्यांनी नितेश राणेंच्या गर्विष्ठ आणि मुजोर वर्तनाला धडा शिकवण्याचे काम सुरू केल्याचे सांगितले.
विनायक राउत यांनी नितेश राणेंना अपात्र ठरविण्यासाठी राज्यपालांकडे अपील दाखल केली आहे. “जर याबाबत योग्य कारवाई झाली नाही, तर पुढील 15 दिवसांत आम्ही हायकोर्टात याचिका दाखल करू,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. या कायदेशीर लढाईमुळे रत्नागिरी आणि कोकणातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
नितेश राणे आणि विनायक राउत यांच्यातील वाद कोकणातील राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. राउत यांच्या या आक्रमक पवित्र्याने नितेश राणेंना प्रत्युत्तर देण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. येत्या काही दिवसांत या प्रकरणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 12-04-2025














