Haryana Election Result : विनेश फोगाटने हरियाणाच्या निवडणुकीचे मैदान मारले..

माजी कुस्तीपटू विनेश फोगाटने काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवत आमदार होण्याचा मान पटकावला. माजी भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने राजकारणात प्रवेश करताच आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला.

हरयाणा विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये काँग्रेसने विनेश फोगाटला जिंद जिल्ह्यातील जुलाना मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. विनेशचा सहकारी कुस्तीपटू बजरंग पुनिया याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून विनेशच्या विजयाची माहिती दिली. विजयी होताच विनेशसह तिच्या सहकाऱ्यांनी एकच जल्लोष केला.

बजरंग पुनियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले की, देशाची मुलगी विनेश फोगाट विजयी झाल्याबद्दल तिचे खूप खूप अभिनंदन. ही लढत फक्त एका जुलाना जागेसाठी नव्हती किंवा इतर ३-४ उमेदवारांविरोधात नव्हती. ही फक्त पक्षाची लढाई नसून, ही लढत देशातील सर्वात मजबूत अत्याचारी शक्तींविरुद्ध होती आणि यात विनेश विजयी झाली. विनेश फोगाटला एकूण ६५,०८० मते मिळाली, तर भाजप उमेदवार योगेश कुमार यांना ५९,०६५ मतदान झाले. इंडियन नॅशनल लोक दलाचे सुरेंदर लाथेर १०,१५८ मतांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिले. विशेष बाब म्हणजे विनेशने आपल्या पहिल्याच निवडणुकीत ६,०१५ मतांनी विजय साकारला.

दरम्यान, २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटला मोठा धक्का बसला होता. कुस्तीपटू विनेशने ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या ५० किलो वजनी गटात भाग घेतला होता. तिने चमकदार कामगिरी करत अंतिम फेरीत स्थान निश्चित केले, परंतु अंतिम सामना सुरू होण्यापूर्वी विनेशचे वजन १०० ग्रॅमने वाढले अन् तिला अपात्र घोषित करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:35 08-10-2024