रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्गचे माजी खासदार विनायक राउत यांनी आज रत्नागिरी दौऱ्यादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना विद्यमान खासदार नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर राणेंनी केलेल्या टीकेचा राउत यांनी खरपूस समाचार घेतला.
दोन दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर टीका करताना म्हटलं होतं की, “उद्धव ठाकरे कोकणात फक्त मासे आणि मटण खाण्यासाठी येतात. ते येणार म्हणजे हॉटेलात कोंबडी वडे आणि मासे तयार ठेवायचे.” यासोबतच, “मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी कोकणासाठी काय केलं?” असा सवालही राणेंनी उपस्थित केला होता.
विनायक राउत यांचा पलटवार
नारायण राणेंच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना विनायक राउत म्हणाले, “नारायण राणेंच्या बुद्धीची नेहमीच कीव येते. ते उतारवयात आहेत, त्यांची ‘साठी बुद्धी नाटी’ अशी अवस्था झाली आहे. कोंबडी वडे फक्त हॉटेलमध्येच मिळतात असं नाही, कोकणातल्या प्रत्येक घरात कोंबडी वडे मिळतात. कोंबडीचोरांना कोंबडी वड्याचं महत्व कळणार नाही.”
पुढे बोलताना राउत यांनी उद्धव ठाकरे आणि कोकणातील जनतेच्या नात्यावर भर दिला. ते म्हणाले, “उद्धव ठाकरे आणि कोकणी माणसाचं नातं कोंबडी वड्यावर नाही, तर विश्वास आणि प्रेमावर आधारित आहे. उद्धवजी कोकणात येतील, तेव्हा ते कोंबडीचोरांना गाडण्यासाठी येतील.”
कोकणातील राजकीय वातावरण तापलं
विनायक राउत यांच्या या वक्तव्यानंतर कोकणातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील शाब्दिक चकमक आता आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. कोकणातील जनता या राजकीय नाट्याकडे लक्ष ठेवून आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 12-04-2025














