खेड नगरपरिषद हद्दीतील तुंबलेल्या गटाराच्या दुर्गंधीने नागरिक हैराण

खेड : खेड नगरपरिषद हद्दीतील रहदारीच्या मार्गावर गटारे तुंबली आहेत. तुंबलेल्या गटारातील पाण्याच्या दुर्गंधीत पादचाऱ्यांचा ‘श्वास’ कोंडला आहे. मुख्य मार्गावर तुंबलेल्या गटारांच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यायला नगरप्रशासनाला सवड मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दुर्गंधीच्या साम्राज्यामुळे दैनंदिन कामकाजासाठी शासकीय कार्यालयामध्ये येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावर धोक्याची टांगती तलवार कायम आहे.

येथील नगरपरिषदेकडून माझी वसुंधरा अभियानांतर्गत अपुऱ्या मनुष्यबळातही कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावून शहर चकाचक ठेवले जात असल्याचा दावा केले जात आहे. दुसरीकडे मात्र नगरपरिषद हद्दीतील बहुतांश गटारे तुंबलेल्या स्थितीत आहेत. या गटारांमध्ये सर्रासपणे कचरा देखील टाकला जात आहे. यामुळे कचरा साचून गटारे तुंबण्याचे प्रमाण वाढले आहे.

नगरप्रशासनाने काही दिवसांपूर्वीच गटारात कचरा फेकणाऱ्यांवर कारवाईची तंबी देखील दिली आहे. मात्र या तंबीला नागरिक जुमानत नसल्याची बाब समोर आली आहे. नजर चुकवून गटारात कचरा फेकला जात असल्याने कारवाई करायची तरी कोणावर, असा प्रश्न नगरप्रशासनापुढे उभा ठाकला आहे. येथील तहसील कार्यालयासमोरील गटारे तुंबली आहेत. तहसील कार्यालयासह पोलीस स्थानकात दैनंदिन कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. मुख्य मार्गावर रहदारीच्या ठिकाणी असलेल्या तुंबलेल्या गटारांच्या स्वच्छतेसाठी नगरप्रशासनाला सवड मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:16 PM 12/Apr/2025