चिपळूण : आदिवासी कातकरी समाजासाठी केंद्र व राज्य शासनाने जाहीर केलेली मोबाईल मेडिकल व्हॅन येथे दाखल झाली आहे. त्याव्दारे सेवा देण्याचाही प्रारंभ झाला असून तालुक्यासह गुहागर व संगमेश्वरमधील प्रत्येक आदिवासी वाडीवर महिन्यातून दोनवेळा जाऊन या व्हॅनव्दारे आरोग्य सुविधा दिल्या जाणार आहेत. त्याचा मोठा फायदा येथील ग्रामस्थांना होणार आहे.
तालुक्याचा विचार करता आदिवासी वाड्या या मुख्य वस्तीपासून डोंगर भागात पूर्वीपासून वसल्या असल्याचे दिसून येते. काही वर्षे मागे जाता त्यांच्यापर्यंत गावातील इतर ग्रामस्थांसह प्रशासकीय यंत्रणेला सहच पोहचणेही शक्य होत नव्हते. तरीही हा समाज आपले जीवन कंठीत होता. मात्र, अलिकडे शासनाने या समाजाकडेही लक्ष देण्यास सुरूवात केली आहे. यातूच घरकुलातून घरे, अन्य योजनेतून विजेची व्यवस्था, रस्ते व आता पाण्याच्या योजनाही राबवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, हे सारे दिले जात असले तरी आरोग्य या मुख्य सुविधेपासून हा समाज वंचित राहिला आहे.
याचा परिणाम म्हणून त्यांच्या अनेक आरोग्याच्या तक्रारी पुढे आल्या. त्यामुळे आता शासनाने मोबाईल मेडिकल व्हॅनव्दारे प्रत्येक वाडीतील ग्रामस्थांना सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार चिपळूण, गुहागर, संगमेश्वर या तीन तालुक्यांसाठी एक मोबाईल मेडिकल व्हॅन येथे दाखल झाली आहे.
त्यानुसार चिपळूण तालुक्यातील २१ गावांमधील ३० तर गुहागर व संगमेश्वर मधील सुमारे १० वाड्यांमध्ये महिन्यातून दोनवेळा ही व्हॅन जाऊन ग्रामस्थांची आरोग्य तपासणी व त्यांना औषधांचा पुरवठा करणार आहे. तसेच या व्हॅनच्या माध्यमातून कुटुंब नियोजन, प्रसुती पूर्व व प्रसुती पश्चात माता व बालसंगोपन, लसीकरण, साथरोग नियंत्रण, क्षयरोग, कुष्ठरोग व इतर राष्ट्रीय कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आयुष्यमान भव गोल्डन कार्ड, आमाकार्ड काढण्यात येणार आहे.
या मोबाईल मेडिकल व्हॅनसाठी महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नाली पाटील, औषध निर्माता मृणाली कदम, आरोग्यसेविका श्रृंखला सुर्वे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ही योजना सुरु करणेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा लेखा व्यवस्थापक लता गुंजवटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव, आरोग्य विस्तार अधिकारी मोहन जाधव, योगेश यहीदे, आरोग्य सहाय्यक मनोहर तायडे, तालुका लेखापाल योगेश कांबळी यांचे सहकार्य लाभले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:44 PM 08/Oct/2024














