दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेत प्रथमच नव्या खासगी विद्यार्थ्यांना संधी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) जुलै ऑगस्ट २०२५मध्ये घेतल्या जाणाऱ्या दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी नव्या खासगी विद्यार्थ्यांनाही संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आतापर्यंत फेब्रुवारी मार्चमधील परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेसाठी संधी दिली जात होती. मात्र, आता शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, या दृष्टीने नव्या खासगी विद्यार्थ्यांनाही परीक्षा देण्याची संधी दिली जाणार आहे.राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. फॉर्म नंबर १७ भरून खासगी विद्यार्थ्यांना दहावी-बारावीची परीक्षा देता येते. त्यानुसार जुलै-ऑगस्ट २०२५मध्ये होणारी परीक्षा खासगी पद्धतीने देण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन नावनोंदणी करावी लागणार आहे. त्यानुसार १५ एप्रिल ते १५ मे या कालावधीत ऑनलाइन अर्ज, शुल्क भरणे, नावनोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीची मुद्रित प्रत, मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या शाळेत, कनिष्ठ महाविद्यालयात जमा करता येणार आहे. नव्या विद्यार्थ्यांना केवळ नियमित शुल्काद्वारेच दिलेल्या मुदतीत केवळ ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज करावा लागणार आहे. विलंब, अतिविलंब शुल्काची मुदत असणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:50 12-04-2025