रत्नागिरी, 12 एप्रिल 2025: रत्नागिरी जिल्हा अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले आहेत. “अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करायचे आहे, यात कोणतीही तडजोड नाही!” असे स्पष्ट करत त्यांनी पोलिसांना तातडीने कारवाई मोहीम राबवण्यास सांगितले. तसेच, प्रसिद्धी माध्यमांनी या सामाजिक मोहिमेत सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक
जिल्हाधिकारी कार्यालयात आज अंमली पदार्थविरोधी कारवाई, नियंत्रण आणि जनजागृतीबाबत आढावा बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, प्र. निवासी उपजिल्हाधिकारी मारुती बोरकर, प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसिलदार राजाराम म्हात्रे, पोलीस निरीक्षक नितीन ढेरे आणि प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

युवा पिढीवर परिणाम, कठोर कारवाईचे निर्देश
पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, “अंमली पदार्थांचा सर्वाधिक परिणाम युवा पिढीवर होत आहे. ग्रामीण भागातील तरुण मृत्युमुखी पडत आहेत. ही प्रत्येक गावाची व्यथा आहे.” त्यांनी वारंवार गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्याचे निर्देश दिले. “अंमली पदार्थांचे जाळे कोणत्याही विशिष्ट धर्म किंवा जातीपुरते मर्यादित नाही. आरोपींची यादी सर्वसमावेशक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
विक्रेता आणि वापरकर्त्यांवर समान कारवाई
डॉ. सामंत यांनी अंमली पदार्थ विक्रेता आणि वापरकर्ता या दोघांवरही समान कारवाई करण्याचे आदेश दिले. “वापरकर्ताही विक्रेत्याइतकाच दोषी आहे. विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि तरुणांनी अंमली पदार्थांपासून दूर राहावे,” असे आवाहन त्यांनी केले. तसेच, अशा व्यक्तींची माहिती पोलिसांना कळवण्याचे आवाहन करताना माहिती देणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवली जातील, अशी ग्वाही दिली.
‘रत्नागिरी पॅटर्न’चा संकल्प
“रत्नागिरीला अंमली पदार्थमुक्त जिल्हा बनवू. येथील यशस्वी मोहीम ‘रत्नागिरी पॅटर्न’ म्हणून राज्यभर पोहोचेल,” असा विश्वास डॉ. सामंत यांनी व्यक्त केला. तसेच, अंमली पदार्थांच्या बाबतीत कोणत्याही दबावाला बळी न पडता कारवाई करण्याचे आणि अशा दबाव आणणाऱ्यांची नोंद ठेवण्याचे निर्देश पोलिसांना दिले. “पोलिसांनी मनावर घेतले तर ते काय करू शकतात, हे जनतेला दाखवून द्यावे,” असेही ते म्हणाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:29 12-04-2025
