रत्नागिरी, 12 एप्रिल 2025 : रत्नागिरी नगरपालिकेच्या दामले विद्यालयाने गेल्या 100 वर्षांत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि समर्पित शिक्षकवर्गाच्या जोरावर हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले आहे. खासगी शाळांच्या स्पर्धेतही आपला ठसा उमटवत, भित्तिचित्रे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यांसारख्या नवकल्पनांसह शाळेने आपली गुणवत्ता टिकवली आहे. आता या शतकोत्तर शाळेच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला जाणार आहे. पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या संकल्पनेतून दामले विद्यालयाचे संपूर्ण रुपडे पालटणार आहे.
डॉ. उदय सामंत यांनी शाळेच्या अत्याधुनिक नवीन इमारतीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. तीन मजली, सुसज्ज आणि आधुनिक सोयींनी युक्त अशी ही वास्तू 1700 विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यास सज्ज होणार आहे. या नव्या इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते 13 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे.
ही अत्याधुनिक शाळा समाजातील सर्व घटकांना उत्तम शिक्षणाची संधी उपलब्ध करून देईल. दामले विद्यालयाच्या या नव्या पर्वामुळे रत्नागिरीच्या शैक्षणिक क्षेत्रात एक नवा मानदंड निर्माण होणार आहे. रत्नागिरीच्या शैक्षणिक इतिहासात दामले विद्यालयाचा हा प्रकल्प एक मैलाचा टप्पा ठरणार आहे.
