Ratnagiri : मासळीचे दर वधारलेलेच!

रत्नागिरी : मच्छीमार नौकांना गेल्या दोन महिन्यांपासून पुरेशी मासळी मिळत नाही. अजूनही तीच परिस्थिती असून रविवारीसुद्धा मासळीचे दर वधारलेलेच होते. दरवर्षी एप्रिल महिन्यात मासळीचा ‘रिपोर्ट’ समाधानकारक असतो. या महिन्यात नौका मालक आशेवर होता.

परप्रांतीय नौकांशी रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्रात होणारी घुसखोरी आणि फेब्रुवारी, मार्च महिन्यात समुद्रातील बदलामुळे होणार्‍या माशांच्या स्थलांतरामुळे मासळी पुरेश्या प्रमाणात मिळत नाही. परप्रांतीय नौकांची जाळी समद्र्राच्या तळापासून पृष्ठभागापर्यंतचा मासा पकडतात. त्यात माशांचे स्थलांतर होत असल्याने स्थानिक मच्छीमार नौकांना खर्चा इतकीही मासळी गेल्या काही महिन्यांपासून मिळत नाही. वातावरण आणि समद्र्रातील बदलामुळे स्थलांतरीत झालेला मासा एप्रिल महिन्यात पुन्हा येतो, असा दरवर्षीचा अनुभव आहे, त्यामुळे एप्रिल महिना सुरू झाल्यानंतर माशांचा रिपोर्ट चांगला मिळेल, अशी मच्छीमार नौका मालकांना अशा होती, ती फोल ठरली आहे.

मासळी अपेक्षित प्रमाणात मिळत नसल्याने मासळीचे दर अजून उतरलेले नाहीत. मिरकरवाडा बंदरावर रविवारी मोठ्या पापलेटचा किलोचा दर 1500 रुपये इतका होता. छोटी पापलेट नौकांना मिळालेली नसल्याने ती विक्रीसाठी उपलब्ध नव्हती. सरंग्याचे प्रमाणसुद्धा फारच कमी होते. त्यामुळे मासळी मार्केटमध्ये मुंबईहून आलेला फ्रोजनचा सरंगा विक्रीला ठेवण्यात आला होता.

सध्याचे माशांचे दर
मोठी सुरमई 800 रुपये किलो दराने, तर छोटी 400 ते 500 रुपये दराने विक्रीला ठेवण्यात आली होती. बांगडा मात्र 100 रुपये किलो दराने आणि सौदाळा 250 रुपये दराने मिळत होता. मोठी कोळंबी 400 ते 450 रुपये, तर लहान कोळंबी 250 रुपये दराने मिळत होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
1:02 14-04-2025