राजापुरात गिरणी कामगारांच्या प्रश्नी १८ एप्रिलला सभा

राजापूर : गेल्या कित्येक वर्षापासून रखडलेला गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लागावा यावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने राज्यभर कामगार व वारसांच्या सभा घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये लांजा व राजापुरात १८ एप्रिलला आणि चिपळूण येथे १९ एप्रिलला सभा होणार असल्याची माहिती राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे उपाध्यक्ष रघुनाथ ऊर्फ अण्णा शिर्सेकर यांनी दिली.

रखडलेला गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न ताबडतोब मार्गी लागावा बासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व संबंधितांची त्वरित बैठक बोलवावी, अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी दिले होते; मात्र, त्यावर अद्यापही बैठक झालेली नाही. त्यामुळे या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने महाआंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून १५ एप्रिलला दुपारी चार वाजता परेल येथील महात्मा गांधी सभागृहात कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांची सभा बोलवण्यात आली आहे.

या महाआंदोलनाला मुंबईसह राज्यातील खेडेगावामधील गिरणी कामगारांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा पाठिंबा लाभावा यासाठी राज्यभर सभा घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये १८ ला सकाळी ११ वा. राजापूर येथे आणि दुपारी ३.३० वा. लांजा येथे १९ ला चिपळूण येथे सकाळी ११ वा. गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची सभा बोलावण्यात आली आहे. राजापूर येथील सभा शहरातील डॉ. आंबेडकर भवन सभागृहात होणार असून उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रीय मिल मजदूर संघाने केले आहे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 AM 14/Apr/2025