फायनान्स कंपन्यांना जादा व्याज देणार नाही; चिपळूणातील मेळाव्यात निर्धार

चिपळूण : मायक्रो फायनान्स कंपन्यांनी धुमाकूळ घातला असून ४५ टक्के व्याज घेऊन सर्वसामान्यांची फसवणूक सुरू केली आहे. त्यामुळे यातून मुक्ती मिळवण्यासाठी संघटित लढा उभारायला हवे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई यांनी केले. तसेच यापुढे ५ ते जास्तीत जास्त ७ टक्क्यांच्यावर व्याज भरायचे नाही, असा निर्धारही करण्यात आला.

जनता दल व कोकण जनविकास समितीच्या वतीने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले, ज्या लोकांना काही कारणांमुळे बँका कर्ज नाकारतात त्यांनाही कर्ज मिळावे, त्यातून त्यांचे लहान लहान उद्योग सुरू व्हावेत अशा अनेक उद्देशाने शासनाने मायक्रो फायनान्स कंपन्यांना परवानगी दिली आहे; मात्र त्याचा या कंपन्या गैरफायदा घेत असून, ज्या लोकांनी हे कर्ज घेतले आहे त्यांना प्रचंड त्रास दिला जात आहे.

त्यांच्याकडून ४५ टक्क्यांपर्यंत व्याज वसुली केली जाते. वसुलीसाठी दमबाजी, मारहाण करत मानसिक त्रास दिला जात आहे. त्यामुळे मायक्रो फायनान्स कंपन्यांची वाढलेली दादागिरी ठेचण्याची वेळ आली आहे. आपल्या अडचणींसाठी घेतलेले कर्ज फेडलेच पाहिजे, या मताचे आपण सर्वजण आहोत; मात्र व्याज किती असावे याला काही मर्यादा आहेत की नाहीत? यापुढे वसुलीसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना तुम्ही भरलेल्या पैशाचा हिशोब सांगा, यापुढे आम्ही पैसे भरणार नाही, असे ठणकावून सांगा. पोलिसांनी महिलांना त्रास देणाऱ्या या कंपन्यांविरोधात कठोर कारवाई करावी.

प्रभाकर नारकर यांनी कंपन्यांनी कायद्याच्या बंधनात राहावे. जर त्यांनी महिलांचा छळ केला तर गाठ आमच्याशी असून त्यांना त्याच भाषेत उतर दिले जाईल. मेळावे हा आंदोलनाचा पहिला टप्पा असून, पुढील टप्प्यात मंत्रालयावर लाटणे आंदोलन करण्याचा इशारा दिला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 AM 14/Apr/2025