लांजा : सहा टन फणस पाने संशोधनासाठी जर्मनीला; कॅन्सर संशोधनात होणार पानांचा वापर

लांजा : तालुक्यातील झापडे येथील मिथिलेश देसाई यांच्या बागेत २८ एकर क्षेत्रांवर सुमारे ७० वेगवेगळ्या जातींचे फणस लागवड केली आहे. या झाडांची पाने जर्मनीतील एका कॅन्सर संशोधन करणाऱ्या कंपनीला पाठविली आहेत. आतापर्यंत सहा टन पाने जर्मनीला निर्यात केली आहेत. त्यावर संशोधन झाल्यास लांजाचे नाव देशाच्या नकाशावर येईल, असे श्री. देसाई यांनी सांगितले.

मिथिलेश यांचे वडील हरिश्चंद्र देसाई यांनी केरळ येथे जाऊन ३६ प्रकारच्या फणसाच्या झाडांची माहिती घेतली आणि ती आपल्या शेतात लावली. त्यातून प्रेरणा घेऊन मिथिलेशही शेतीकडे वळला. त्याने महात्मा फुले कृषी विद्यापीठातून कृषी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले.

त्यानंतर त्यांनी आपल्या शेताजवळ एक प्रयोगशाळा सुरू केली. त्यामध्ये फणसाचे पोषणमूल्य, त्यावर प्रक्रिया आणि व्यावसायिक शक्यता यावर संशोधन सुरू केले. २०१८ मध्ये मिथिलेश यांनी फणसाचे रोपवाटिका केंद्र सुरू केले. झापडे येथील छोटयाशा गावात त्यांनी केलेली फणस शेती आज परदेशात नावारूपास आली आहे. वडिलांच्या नावाने ‘हरिश्चंद्र’ नावाची फणसाची नवीन जात विकसित केली. पहिल्या वर्षों फक्त १ हजार रोपे विकली जात होती; पण आज दरवर्षी २५ हजारपेक्षा जास्त रोपांची विक्री होते, असे त्यांनी सांगितले.

वाढत्या मागणीमुळे त्यांनी १०० शेतकऱ्यांना एकत्र करून फार्मर्स प्रोड्युसर कंपनी’ (एफपीसी) स्थापन केली, केवळ फणसच विकून नव्हे, तर त्यांनी फणसाच्या पानाचाही योग्यप्रकारे वापर करता येईल का? याचा विचार सुरू केला आहे. फणसाच्या पानातून कॅन्सरसारख्या आजारावर नियत्रण मिळवणे शक्य होईल का, यावर जर्मनीत संशोधन सुरू आहे. त्या संशोधनासाठी विशिष्ट फणसाची पाने देसाई यांच्याकडे आहेत. त्यांनी जर्मनीतील एका कंपनीला फणसाची पाने पाठवलेली आहेत,

फणसाच्या शिजवलेल्या गराला शाकाहारी मांसाचा उत्तम पर्याय म्हणून पाहिले जाते. तसेच फणसावर आधारित विविध प्रक्रिया उत्पादने जसे की, चिप्स, पीठ आणि पल्प यांना मोठ्या बाजारपेठेत मागणी आहे. आता मिथिलेश हे ११ हजार चौरस फूट जागेत प्रक्रिया केंद्र उभारण्याच्या तयारीत आहेत. मिखिलेश यांनी पारंपरिक शेतीला विज्ञान आणि व्यवसाय यांची जोड देत एक नवा आदर्श निर्माण केला आहे. फणसाला बाजारपेठ मिळवून देऊन त्यांनी अनेक शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा नवा मार्ग उघडला आहे. त्यांच्या या यशस्वी प्रवासातून महाराष्ट्रातील तरुण शेतकऱ्यांना नवा स्फूर्तिमंत्र मिळत आहे. त्यांच्या ‘जंक्फ्रूटकिंग अॅग्रो प्रोड्युसर कंपनी’ने वार्षिक १ कोटींची उलाढाल साध्य केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 PM 14/Apr/2025