राजापुरातील भूमिगत वीजवाहिन्या बंदच

राजापूर : शहरात आठ वर्षांपूर्वी भूमिगत वीजवाहिनीचे काम पूर्णत्त्वास गेले असले तरी अद्याप या भूमिगत वीजवाहिन्या बंद स्थितीत असल्याने ही वाहिनी शोभेची बाहुली बनून राहिली आहे. मात्र, या वीजवाहिनीमुळे शहरात येणाऱ्या मुख्य रस्त्यावर वीजवाहिन्यांच्या केबल व डीपी वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. ही भूमिगत वीजवाहिनी आता राजापूरवासीयांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

शासनाच्या जिल्हा वार्षिक योजनेतून सन २०१७ – २०१८ या वर्षात सुमारे ३९ लाख रुपयांचा निधी भूमिगत वीजवाहिनीसाठी खर्च करण्यात आला होता. या कामाबाबत केलेल्या तक्रारींकडे कानाडोळा करत हे काम तसेच रेटवून नेले होते. राजापूर नगर परिषदेनेही या कामाकडे म्हणावे तसे लक्ष दिले नव्हते. त्यानंतर या भूमिगत वीजवाहिन्यांची चाचणी घेण्यात आली. मात्र, त्यामध्ये दोष आढळल्याने या वीजवाहिन्या सुरू करण्यात आल्या नाहीत. सद्यस्थितीत या वीजवाहिन्या अनेक ठिकाणी जमिनीच्या वर आल्या आहेत तर काही ठिकाणी रस्त्याची कामे करताना तुटल्या आहेत.

हे काम करताना ठेकेदाराने डीपी रस्त्यालगत टाकल्याने व त्याच्या केबल तशाच उघड्या ठेवल्याने आता त्या वाहतुकीसाठी अडथळा ठरू लागल्या आहेत. लाखो रुपये खर्च करूनही या भूमिगत वीजवाहिन्या सुरू न झाल्याने शहरातील ओव्हरहेड वीजवाहिन्या व विजेचे खांब यांचे जाळे व त्यातून होणारे अपघात कायम आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:27 PM 14/Apr/2025