भारत मातेची सेवा हे प्रत्येक संघ स्वयंसेवकाचे आद्य कर्तव्य : अमित पाल

राजापूर : भारत मातेची सेवा हे प्रत्येक संघ स्वयंसेवकाचे आद्य कर्तव्य असले पाहिजे असे सांगताना हिंदु समाजाचे संघटन व सशक्तीकरण होण्यासाठी प्रत्येक मंडळामध्ये संघाचे कामकाज सुरू झाले पाहिजे. आणि हे काम सर्वस्पर्शी, सर्वव्यापी असले पाहिजे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे दक्षिण रत्नागिरी विभाग प्रचारक अमित पाल यांनी येथे केले.

राजापुरातील राष्ट्रीय सेवा समितीच्या नूतनीकृत वास्तूचे उद्घाटन व लोकार्पण रविवारी रत्नागिरी विभागाचे संघचालक दत्ताराम सोलकर यांच्या हस्ते करण्यात आले. तर या नूतनीकृत वास्तूचे नामकरण गुरूवर्य वासुकाका जोशी भवन असे करण्यात आले असून त्याच्या नामफलकाचे अनावरण श्री. सोलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी झालेल्या संघ स्वयंसेवक मार्गदर्शन सत्रात प्रमुख वक्ते म्हणून श्री. पाल बोलत होते.

याप्रसंगी रत्नागिरी विभागाचे संघचालक दत्ताराम सोलकर, जिल्हा संघ चालक दक्षिण रत्नागिरी सुहास पराडकर, तालुका संघचालक राजेंद्र कुशे, रत्नागिरी विभाग निमंत्रीत कार्यकारिणी सदस्य दिलीप गोखले, जिल्हा कार्यवाह डॉ. प्रमोद सुर्वे, प्रकाश रिसबुड, कोषाध्यक्ष अड. प्रशांत पाध्ये, माजी तालुका संघचालक डॉ. बाळकृष्ण पाध्ये यांसह शहर व तालुका परिसरातील संघ स्वयंसेवक उपस्थीत होते.

यावेळी श्री. पाल यांनी संघकार्यात राजापूर संघाचे नेहमीच योगदान राहिले आहे असे सांगताना तसेच त्यांनी कार्यालयाची उपयुक्तता, शाखेची नियमावली काय असली पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले. तर स्वयंसेवक म्हणून काम करताना कोणत्या गोष्टींचे पालन अपेक्षीत आहे याविषयी उद्बोधन केले. शाखेमध्ये अनुशासन असले पाहिजे, स्वच्छता असली पाहिजे, स्वदेशीचे पालन व्हायला हवे, शाखेचा समाजाला आधार वाटला पाहिजे, शाखेचा समाजावर प्रभाव असला पाहिजे आणि शाखेमध्ये गुणवत्ता असली पाहिजे आणि ती वाढली पाहिजे. असे सांगितले त्याचबरोबर स्वयंसेवकांनी देशाच्या उन्नतीमध्ये योगदान देण्यासाठी पंचकतर्व्याचे पालन केले पाहिजे असे ते म्हणाले.

यावेळी अड. प्रशांत पाध्ये यांनी समुह गीत, तर सुशांत बाकाळकर यांनी वैयक्तीक पद सादर केले. सुत्रसंचालन राजापूर तालुका संघ कार्यवाह समीर तावडे यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:34 08-10-2024