मंडणगड : तालुक्यात खरीप हंगामातील पिके अंतिम टप्प्यात आलेली असताना डुकरे, माकडे यांचा उपद्रव वाढला आहे. वन्यजीव पिकांची मोठी नासधूस करीत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
वन्यजीवांनी शेतीकडे वळविलेला मोर्चा लक्षात घेता विविध कारणांनी अडचणीत असलेल्या शेतीचे आणखी नुकसान होत आहे. वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून वन विभाग कृषी विभाग व संबंधित यंत्रणा पिकांचे संरक्षणासाठी काही उपाययोजना करणार आहेत की नाही.
असा प्रश्न समस्याग्रस्त शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. नेहमीप्रमाणे पिकांची नासधुस केल्यावर पंचनामे करून नुकसानभरपाईसाठी शेतकऱ्यांना फेऱ्या मारायला लावण्यापेक्षा वन विभागाने या समस्येवर कायमस्वरूपी उपाय करण्याची आवश्यकताही व्यक्त केली जात आहे.
विविध कारणाने तालुक्यातील शेतीक्षेत्र दरवर्षी घटत असल्याचे कृषी विभागाची आकडेवारी सांगत आहे. त्यात प्रभावी ठरणाऱ्या महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये वन्यप्राण्यांचा उपद्रव ते करीत असलेली पिकाची नासधूस हा मुद्दा यंदा अगदी प्रकर्षाने जाणवत आहे.
निवडणुकांमुळे बंदुकाही जमा कराव्या लागणार
राज्यात निवडणुका येऊ घातल्याने लवकरच शेती संरक्षणासाठी अधिकृत परवाने असलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बंदुकाही शासनाकडे जमा कराव्या लागणार आहेत. त्यामुळे पिके तयार होताना जंगली प्राण्यापासून शेतीचे संरक्षण कसे करावे, ही एक समस्या तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर उभी राहणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:34 PM 08/Oct/2024














